IND vs SA Suryakumar : सूर्यकुमारचा टी-20 मध्‍ये ‘डबल रेकॉर्ड’, पाकच्‍या रिझवानचा विक्रम मोडीत | पुढारी

IND vs SA Suryakumar : सूर्यकुमारचा टी-20 मध्‍ये 'डबल रेकॉर्ड', पाकच्‍या रिझवानचा विक्रम मोडीत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्‍याच सामन्‍यात दिमाखदार विजय मिळवला. (IND vs SA Suryakumar ) तीन सामन्‍यांच्‍या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली. या सामन्‍यात सूर्यकुमार यादवने धडकेबाज खेळी केली. या सामन्‍यात सूर्यकुमारने आपल्‍या नावावर दोन मोठे विक्रम नोंदवले आहेत. आपल्‍या खेळीने त्‍याने भारताचा आघाडीचा फलंदाज शिखर धवनसह पाकिस्‍तानचा सलामीवीर मोहम्‍मद रिझवान याचा विक्रम मोडित काढला आहे.

सूर्यकुमारची दक्षिण आफ्रिकेविरुद्‍ध दमदार फलंदाजी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेतील पहिल्‍याच सामन्‍यात धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि विराट कोहली झटपट बाद झाले. भारताची अवस्‍था बिकट झाली होती. यानंतर सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूत ५० धावांची दमदार खेळी केली. त्‍याने ५ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार लगावले. त्‍याच्‍या या खेळीने भारताचा विजय स्‍पष्‍ट झाला.

IND vs SA Suryakumar : मोहम्‍मद रिझवानचा विक्रम मोडीत

सूर्यकुमार यादव याने पाकिस्‍तानचा आघाडीचा फलंदाज मोहम्‍मद रिझवान याला मागे टाकले आहे. रिझवान याने मागील वर्षी म्‍हणजे २०२१ मध्‍ये टी-२० क्रिकेटमध्‍ये ४२ षटकार ठोकले होते. त्‍याने एका वर्षात सर्वाधिक षटकार फटकविण्‍याचा रेकॉर्ड केला होता. हा रेकॉर्ड सूर्यकुमारने मोडला आहे. त्‍याने २०२२ या वर्षात आतापर्यंत ४५ षटकार ठोकले आहेत. या कामगिरीमुळे एक वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्‍याचा विक्रम त्‍याने आता आपल्‍या नावावर केला आहे. विशेष म्‍हणजे, ऑक्‍टोबर महिन्‍यात टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धा होणार आहे. त्‍यामुळे सूर्यकुमार याच्‍या नावावर आणखी षटकार नोंदले जाणार आहेत.

टी-२०मधील एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज

सूर्यकुमार यादव हा सध्‍या उत्‍कृष्‍ट फलंदाजीचे प्रदर्शन करत आहे. टी-२० क्रिकेटमध्‍ये एका वर्षांत सर्वाधिक धावा करणारा तो भारतीय फलंदाज ठरला आहे. त्‍याने शिखर धवनचा विक्रम मोडला आहे. शिखर धवन याने २०१८ मध्‍ये एका वर्षात टी-२० क्रिकेटमध्‍ये ६८९ धावा केल्‍या होता. एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू हा विक्रम शिखर धवनच्‍या नावावर होता. सूर्यकुमारने २०२२ मध्‍ये २१ डावांमध्‍ये ७३२ धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

सूर्यकुमार ठरतोय मॅच विनर

सामना जिंकून देणारा खेळाडू अशी सूर्यकुमारची ओळख होत आहे. त्‍याने टीम इंडियात १३ वनडे सामन्‍यात ३४० धावा केल्‍या आहेत. तर आतापर्यंत ३२ टी-२० सामन्‍यांमध्‍ये ९७६ धावा केल्‍या आहेत. यामध्‍ये इंग्‍लंड विरुद्ध तुफानी शतकी खेळीचा समावेश आहे. टीम इंडियाच्‍या मधल्‍या फळीत महत्त्‍वपूर्ण फलंदाज अशी त्‍याची ओळख झाली आहे. खेळपट्‍टी कितीही कठीण असली तरी त्‍याने आपली गुणवता सिद्ध केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button