FIFA U-17 Women’s World Cup : नवी मुंबईत रंगणार १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक; डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियमवर होणार सामने | पुढारी

FIFA U-17 Women's World Cup : नवी मुंबईत रंगणार १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक; डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियमवर होणार सामने

नवी मुंबई; पुढारी वृत्तसेवा : फुटबॉलची 17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 येत्या ऑक्टोंबरमध्ये  नेरुळ नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये रंगणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 30 ऑक्टोबर रोजी डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. या निमित्ताने नवी मुंबई शहराला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकण्याची संधी मिळाली आहे. यादृष्टीने महापालिकेसह सर्व संबंधित प्राधिकरणांनी तयारी करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले. (FIFA U-17 Women’s World Cup)

11 ते 30 ऑक्टोबर भारतात 17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 सामने होणार आहेत. यामधील महत्वाचे 5 सामने सेक्टर 7, नेरुळ नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये 12, 15, 18, 21 व 30 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहेत. या अनुषंगाने यजमान शहर म्हणून करावयाच्या तयारीचा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सविस्तर आढावा घेतला. (FIFA U-17 Women’s World Cup)

महापालिका अधिकारी, वाहतुक विभागाचे डीसीपी पुरुषोत्तम कराड, फिफाच्या पदाधिकारी रोमा खन्ना,  मनदीप सहरन, अर्पिता नाखवा, श्रुती दागा,  उमाशंकर कनोजिया तसेच डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियम व्यवस्थापनाचे संचालक वृंदन जाधव आणि संबंधित महापालिका, पोलीस अधिकारी व फुटबॉल फेडरेशनचे अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई शहरामध्ये जागतिक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉल फिव्हर निर्माण व्हावा यादृष्टीने स्वच्छ सर्वेक्षण 2023 ला याच कालावधीत सुरुवात होत असल्याने शहरातील महत्वाच्या चौकांचे व प्रदर्शनी जागांचे फुटबॉल खेळाच्या अनुषंगाने सुशोभिकरण करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. वाहतुक व पार्किंग व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी वाहतुक पोलीस विभागाला दिल्या. वाहतुक पोलिसांना आवश्यक त्या सर्व बाबींच्या नियोजनात महापालिकेच्या संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने  नियोजन केले जाणार आहे.

16 देशांचे संघ सहभागी होणार

प्रत्येक दिवशी 2 सामने याप्रमाणे 5 दिवस डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियम येथे सामने होणार असून विशेष म्हणजे या स्पर्धेचा अंतिम सामना 30 ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममध्ये होणार आहे. या जागतिक स्पर्धेमध्ये अमेरिका, मोरोक्को, ब्राझील, जर्मनी, नायजेरिया, चिली, न्युझीलंड, स्पेन, कोलंबिया, मेक्सिको, चीन, जपान, टान्झानिया, कॅनडा, फ्रान्स आणि यजमान भारत अशा 16 देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

नेरुळच्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगणामध्ये होणार सामन्यांपूर्वीचा सराव

महापालिकेने 2017 साली नवी मुंबईत झालेल्या फिफा स्पर्धेच्या वेळी विकसित केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेक्टर 19 नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणामध्ये या स्पर्धेतील सामन्यांपूर्वीचा सराव फुटबॉल संघ करणार असून त्याठिकाणची सर्व व्यवस्था सुसज्ज राहील व विशेषत्वाने फ्लड लाईटच्या रिफोकसिंगची कामे गुणवत्तापूर्ण व जलद करून घ्यावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले.

हेही वाचा;

Back to top button