ठाणे: जखमी गोविंदा प्रथमेश सावंतला मुख्यमंत्री शिंदेंकडून ५ लाखांची मदत | पुढारी

ठाणे: जखमी गोविंदा प्रथमेश सावंतला मुख्यमंत्री शिंदेंकडून ५ लाखांची मदत

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : दहीहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या २२ वर्षाच्या गोविंदाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तीकरित्या ५ लाखांची मदत केली. ही मदत शिवसेना प्रवक्ते व ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी प्रथमेश सावंत याच्याकडे मंगळवारी (दि.२७) सुपूर्द केली. शिवसेना त्याच्या पाठीशी असल्याचा दिलासाही दिला.

करीरोड येथील साईभक्त क्रीडा मंडळ गोविंदा पथकातील प्रथमेश सावंत हा गोविंदा थर लावताना पडल्याने जखमी झाला होता. त्याच्या मणक्याला मोठी दुखापत झाली आहे. प्रथमेशवर मुंबईतील के.ई. एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रथमेशला आईवडील नसून त्याचा सांभाळ नातेवाईक करीत आहे. त्याला आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्त‍िकरित्या ५ लाखांची मदत केली आहे.

शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आज के.ई.एम. रुग्णालयात प्रथमेश याची भेट घेवून त्याची विचारपूस केली व ५ लाखांची मदत सुपुर्द केली. सरकार त्याच्या पाठीशी आहेच. परंतु, शिवसेना सदैव त्याच्या सोबत असल्याची ग्वाही नरेश म्हस्के यांनी दिली. यावेळी प्रथमेश याचे नातेवाईक, के. ई. एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता, रुग्णालय प्रशासन व साईभक्त क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व टेंभीनाका उपविभागप्रमुख स्वानंद पवार, शाखाप्रमुख नितीन बुडजडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत प्रथमेश सावंत याच्या तब्बेतीकडे लक्ष ठेवून असल्याबाबत व त्याला वैयक्त‍िकरित्या ५ लाखांची मदत केल्याबद्दल प्रथमेशचे नातेवाईक व साईभक्त क्रीडा मंडळाच्या गोविंदा पथकाने त्यांचे आभार मानले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button