Shahid Afridi : होय, मी चिटिंग केली होती.. : शाहीद आफ्रिदी | पुढारी

Shahid Afridi : होय, मी चिटिंग केली होती.. : शाहीद आफ्रिदी

कराची, वृत्तसंस्था : पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि चिटिंग यांचे फार जवळचे नाते आहे. मॅच फिंक्सिंग, स्पॉट फिक्सिंग यांसारखे भ्रष्टाचार तर त्यांनी केलेलेच आहेत, पण त्याचबरोबर प्रतिस्पर्ध्यांशी उद्धट बोलणे, चेंडू कुडतरवणे, दाताने चावणे, झाकणाने ओरखडणे अशा गैरप्रकारांची ओळख पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी जगाला करून दिली. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) हा तर त्यासाठी खूपच बदनाम खेळाडू. त्याने 2005 मध्ये केलेल्या एका गैरकृत्याची आता कबुली दिली आहे. आफ्रिदीने समा टीव्हीशी बोलताना मान्य केले की त्याने खेळपट्टीशी छेडछाड केली होती. असे करणे ही माझी मोठी चूक होती.

आफ्रिदी (Shahid Afridi) समा टीव्हीशी बोलताना म्हणाला की, ‘सन 2005 मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात फैसलाबादमध्ये येथे एक कसोटी झाली होती. या सामन्यात माझे सर्वस्व पणाला लावून गोलंदाजी करत होतो. मात्र, खेळपट्टीकडून काही केल्या मदत मिळत नव्हती. तेवढ्यात बाजूला एक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सर्वांचे लक्ष त्याकडे गेले. दरम्यान, मी शोएब मलिकशी बोलताना म्हटले की मला खेळपट्टीवर एक रफ पॅच (खड्डा) तयार करावे असे वाटते आहे. यामुळे चेंडू स्पिन व्हायला मदत होईल. मलिक देखील म्हणाला, हो पॅच तयार कर कोणी तुझ्याकडे बघत नाही.’

शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) पुढे म्हणाला की, ‘मग मी खेळपट्टीवर एक रफ पॅच बनवला मग खेळपट्टीकडून मला मदत मिळण्यास सुरुवात झाली. जे काही झाले ती जुनी गोष्ट आहे. मात्र, आता मागे वळून पाहताना या गोष्टीचा मला पश्चाताप होत आहे. ही माझी चूक होती, मी असे करायला नको होते.’

फैसलाबाद कसोटी ही तीन सामन्यांच्या मालिकेतील तो दुसरा कसोटी सामना होता. पाकिस्तानने मुल्तानमध्ये पहिला कसोटी सामना 22 धावांनी जिंकला होता, तर दुसरा फैसलाबाद कसोटी सामना ड्रॉ झाला होता. दरम्यान, पाकिस्तानने तिसर्‍या लाहोर कसोटीत एक डाव आणि 100 धावांनी विजय मिळवून मालिका 2-0 अशी खिशात टाकली होती.

शाहीद आफ्रिदीने आपल्या कारकिर्दीत 27 कसोटी सामने खेळले आहेत. तर 398 वन-डे आणि 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Back to top button