IND A vs NZ A : भारत ‘अ’ संघाचा न्यूझीलंड ‘अ’वर विजय | पुढारी

IND A vs NZ A : भारत ‘अ’ संघाचा न्यूझीलंड ‘अ’वर विजय

चेन्नई, वृत्तसंस्था : सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताच्या युवा संघाने (IND A vs NZ A) आज न्यूझीलंडच्या युवा ब्रिगेडला वन-डे सामन्यात पराभवाची धूळ चारली. शार्दूल ठाकूर व कुलदीप सेन यांच्या सुरेख गोलंदाजीनंतर ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी व कर्णधार संजू सॅमसन यांच्या फलंदाजीने बाजी मारली. तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. दुलीप करंडक स्पर्धेत वेस्ट झोनकडून उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीत शतक झळकावणारा पृथ्वी शॉ या सामन्यात अपयशी ठरला. भारतीय संघातील पुनरागमनात त्याला खेळात सातत्य राखता आले नाही.

तीन अनधिकृत कसोटी सामन्यानंतर भारत ‘अ’ व न्यूझीलंड ‘अ’ (IND A vs NZ A) यांच्यातल्या वन-डे मालिकेला सुरुवात झाली. पृथ्वी शॉचे संघातील पुनरागमन आणि संजू सॅमसनकडे सोपवण्यात आलेली कर्णधारपदाची जबाबदारी याकडे सर्वांचे लक्ष होते.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्यांचे फलंदाज अपयशी ठरले. शार्दूल ठाकूर व कुलदीप सेन यांनी भन्नाट गोलंदाजी करताना किवीचे 8 फलंदाज 74 धावांवर माघारी पाठवले. कर्णधार रॉबर्ट ओडोनेलने या 8 फलंदाजांमध्ये सर्वाधिक 22 धावा केल्या. त्यानंतर मिचल रिपॉन व जो वॉकर यांनी संघर्ष केला. रिपॉनने 104 चेंडूंत 4 चौकारांसह 61 धावा केल्या, तर वॉकर 36 धावांवर रनआऊट झाला. किवीचा संघ 40.2 षटकांत 167 धावांत तंबूत परतला. शार्दूलने 4, कुलदीप सेनने 3 व कुलदीप यादवने 1 विकेट घेतली.

प्रत्युत्तरात पृथ्वीने आल्या आल्या षटकार खेचून हवा केली, परंतु 17 धावांवर त्याची विकेट पडली. ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठी यांनी 1 बाद 35 वरून संघाचा डाव 91 धावांपर्यंत नेला. राहुल 40 चेंडूंत 31 धावा करून माघारी परतला. संजू मैदानावर येताच चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतले. त्याच्या नावाचा जयघोष झाला. ऋतुराजने 54 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 41 धावा केल्या. संजूने नाबाद 29 व रजत पाटीदारने नाबाद 45 धावा करून भारताला 7 विकेटस् राखून विजय मिळवून दिला.

Back to top button