

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेत टीम इंडिया आज पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना विराट कोहलीसाठी विशेष ठरणार आहे. कारण कोहलीचा हा टी-20 क्रिकेटमधला 100 वा सामना आहे. कोहली यासोबतच असा पराक्रम करणार आहे जो आतापर्यंत कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूने केला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात तो मैदानात उतरताच एक विशेष स्थान मिळवणार आहे.
विश्वचषक असो वा आशिया चषक असो, जोपर्यंत भारत-पाकिस्तान सामना होत नाही, तोपर्यंत त्या स्पर्धेला खरी सुरुवात होत नाही. तेव्हा आशिया चषक जरी शनिवारी सुरू झाला असला, तरी त्याची खरी सुरुवात आजच्या भारत-पाकिस्तान लढतीने होणार आहे. ऑक्टोबर 2021 साली टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून लाजिरवाणा पराभव केल्याची आठवण घेऊन आपण या सामन्याला सामोरे जाणार आहोत.
विराट कोहलीची आजचा शंभरावा सामना असेल. या सामन्यासह प्रत्येक फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 99 टी-20 सामन्यांव्यतिरिक्त 102 कसोटी आणि 262 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
आशिया चषकांत आतापर्यंत भारत-विरुद्ध पाकिस्तान असे 14 सामने झाले असून, यात 8 सामने भारताने, तर 5 सामने पाकिस्तानने जिंकले होते. एक सामना अनिर्णीत राहिला आहे. भारताने आजवर 7 वेळा, तर पाकिस्तानने दोनवेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. यंदा आशिया चषकात भारत आठव्यांदा चषक मायदेशी परत आणण्यासाठी सज्ज आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी सहसा पाटा खेळपट्टी म्हणून ओळखली जाते. मात्र, दोन ते तीन सलग सामने झाल्यानंतर खेळपट्टीवर अतिरिक्त उसळी आणि चेंडू जास्त सीम होण्यास सुरुवात होते. मात्र, पहिले काही सामने हे जास्त धावसंख्येचे होतील, असा अंदाज आहे. गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून पाहावयाचे झाले, तर 180 आणि 190 धावांचे टार्गेटदेखील या स्टेडियमवर सेफ टार्गेट नाही. दुबईत नाणेफेकीला जास्त महत्त्व आहे. जो टॉस जिंकेल, तो सामना जिंकेल, असे गेल्या काही सामन्यांवरून दिसते. आता आपल्या शंभराव्या टी-20 सामन्यांत विराट कोहलीच्या कामगिरीकडे त्याच्या चाहत्यांसह देशवासीयांचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा :