‘बाबर; भावा लग्न कर…’; रोहितच्या सल्ल्यानंतर पाक कॅप्टनची कळी खुलली, पण… | पुढारी

‘बाबर; भावा लग्न कर...’; रोहितच्या सल्ल्यानंतर पाक कॅप्टनची कळी खुलली, पण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : rohit sharma-babar azam : आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी सर्व तयारी करण्यात झाली आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कंबर कसली आहे. दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ एकत्र सराव करत होते. यादरम्यान भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू अनेकदा एकमेकांसमोर आले आणि भेटले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही एकमेकांना भेटले. दोघांनी काही वेळ एकमेकांशी गप्पा मारल्या. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन्ही खेळाडूंच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पीसीबीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही खेळाडू संभाषणात मस्ती करताना दिसत आहेत. शेवटी रोहित शर्मा गमतीने बाबर आझमला म्हणतो की, “भाई लग्न कर.” रोहितचे हे शब्द ऐकून बाबरलाही आश्चर्य वाटले. प्रत्युत्तरात तो लाजून म्हणतो की, ‘नाही… मी आता नाही करणार…’

यापूर्वी बाबर आझम आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांची भेट झाली होती. 2019 च्या बैठकीचा संदर्भ देत विराट म्हणाला होता की, जागतिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही बाबरबद्दल तुमच्या मनात असलेला आदर बदललेला नाही. विराटने त्याचे वर्णन सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज असे केले.

आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान 15 वा सामना…

आशिया चषक स्पर्धेतील उभय संघांमधील हा 15 वा सामना असेल. याआधीच्या 14 सामन्यांमध्ये आठ सामने भारताने तर पाच पाकिस्तानने जिंकले होते. एक सामना पावसामुळे वाया गेला. 2012 मध्ये या स्पर्धेत भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता.

10 महिन्यांनंतर दोन्ही संघ पुन्हा भीडणार…

दहा महिन्यांनंतर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकमेकांना भीडणार आहेत. यापूर्वी, दोघेही 24 ऑक्टोबर 2021 रोजी टी-20 विश्वचषक स्पर्धेत दुबईच्या मैदानावर खेळले होते, ज्यामध्ये पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात विराट कोहली कर्णधार होता. दरम्यान, त्या टी-20 विश्वचषकापूर्वीच विराटने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. एक कर्णधार म्हणून पाकिस्तानविरुद्धचा शेवटचा सामना विराटला विसरता येणारा नाही. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेनंतर रोहित शर्मा नियमित कर्णधार झाला. पाकिस्तानचा बदला घेण्याची जबाबदारी आता रोहितवर आहे.

Back to top button