Twin Tower Noida : ३४ कंपन्‍या, अब्‍जावधींची उलाढाल, जाणून घ्‍या २०० कोटींच्‍या ट्विन टॉवरची उभारणी ते ‘जमीनदोस्‍त’ पर्यंतचा प्रवास | पुढारी

Twin Tower Noida : ३४ कंपन्‍या, अब्‍जावधींची उलाढाल, जाणून घ्‍या २०० कोटींच्‍या ट्विन टॉवरची उभारणी ते 'जमीनदोस्‍त' पर्यंतचा प्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  दिल्ली एनसीआरच्या नोएडा भागातील ट्विन टॉवरची सध्या जोरदार चर्चा आहे; कारण कुतूबमिनारहून अधिक उंचीचे जुळे टॉवर रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास जमीनदोस्त केला जाणार आहे. ( Twin Tower Noida ) केवळ १२ सेंकदांमध्‍ये ३२ आणि २९ मजली दोन इमारती जमीनदोस्‍त होतील. सुमारे २०० कोटी रुपयांहून अधिक खर्च आलेल्‍या ट्विन टॉवरला जमीनदोस्‍त करण्‍यासाठी २० कोटी रुपये खर्च येणार आहे. जाणून घेऊया या ट्विन टॉवरचे मालक व त्‍यांनी ही एवढी मोठी इमारत कशी उभारली या विषयी…

ट्विन टॉवरची मालकी कोणाकडे ?

दिल्ली एनसीआरच्या नोएडा भागातील ट्विन टॉवर हा सुपरटेक कंपनीची निर्मिती होती. या कंपनीच्‍या मालकांचे नाव आहे आर के अरोरा. बांधकाम, आर्थिक सल्‍लगार, शेअर विक्री आणि खरेदी, प्रिंटिग, चित्रपट निर्मिती, गृह कर्ज अशा विविध ३४ कंपन्‍यांची त्‍यांनी आजवर उभारणी केली.

मीडिया रिपोर्ट्‍स नुसार, आर. के. अरोरा यांनी आपल्‍या काही सहकार्‍यांसमवेत ७ डिसेंबर १९९५ रोजी आपल्‍या सुपरटेक कंपनीची सुरुवात केली. नोएडा, ग्रेटर नोएडा, यमुना विकास प्राधिकरण क्षेत्र, मेरठ, दिल्‍ली-एनसीआरसह देशातील १२ शहरामंध्‍ये त्‍यांनी बांधकाम क्षेत्रात आपले प्रकल्‍प सुरु केले. काही वर्षांमध्‍ये बांधकाम क्षेत्रातील अग्रणी अशी त्‍यांच्‍या कंपनीची ओळख झाली. यानंतर त्‍यांनी विविध क्षेत्रात ३४ कंपन्‍या सुरू केल्या.

सुपरटेक लिमिटेड कंपनी सुरुवात झाल्‍यानंतर चार वर्षांनी म्‍हणजे १९९९ मध्‍ये अरोरा यांनी पत्‍नी संगीता अरोरा यांनी सुपरटेक बिल्‍डर्स आणि एंड प्रमोटर्स प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनी सुरु केली होती. तसचे आपला पुत्र मोहित अरोरा यांच्‍यासह उर्जा निर्मिती, वितरणामध्‍ये त्‍यांनी काम सुरु केले.

Twin Tower Noida : ३२ मजली इमारत कशी उभी राहिली?

दिल्ली एनसीआरच्या नोएडा भागातील ट्विन टॉवरच्‍या कामकाजाची सुरुवात २३ नोव्‍हेंबर २००४ रोजी झाली. नोएडा अथॉरिटीने सेक्‍टर ९३ अ स्‍थित प्‍लॉट नंबर चार ताब्‍यात घेतला. तळमजल्‍यासह एकूण ९ मजली बांधकामाला परवानगी मिळाली. दोन वर्षांनी म्‍हणजे २९ डिसेंबर २००६ रोजी नोएडा अथॉरिटीने ९ ऐवजी ११ मजली बांधकामाला परवानगी दिली. यानंतर यामध्‍ये दरवर्षी वाढ करत अखेर २६ नोव्‍हेंबर २००९ रोजी १७ मजली टॉवरच्‍या बांधकामाला मंजुरी दिली होती. यानंतर पुन्‍हा यात बदल झाला आणि २ मार्च २०१२ मध्‍ये दोन्‍ही टॉवरमध्‍ये ४० मजल्‍यापर्यंत बांधकामास परवानगी मिळाली. दोन टॉवरमधील अंतर केवळ ९ मीटर ठेवण्‍यात आले. नियमानुसार हे अंतर किमान १६ मीटर असणे आवश्‍यक होते.

बांधकामाला परवानगी मिळाल्‍यानंतर सुपरटेक कंपनीने एका टॉवरचे बांधकाम ३२ मजल्‍यांपर्यंत तर दुसर्‍याचे २९ मजल्‍यांपर्यंत पूर्णही केले. यानंतर या प्रकरणी न्‍यायालयात गेले. यानंतर टॉवर उभारणी झालेला. भ्रष्‍टाचार चव्‍हाट्यावर आला. अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाचा या प्रकरणाचा खटला सात वर्ष चालला, अखेर ३१ ऑगस्‍ट २०२१ रोजी उच्‍च न्‍यायालयाने कायम ठेवत टॉवर जमीनदोस्‍त करण्‍याचे आदेश दिले. तसेच टॉवर २२ मे २०२२पर्यंत जमीनदोस्‍त करा, असा आदेशही दिला. मात्र, याची तयारीच अपूर्ण असल्‍याने तारीख पुन्‍हा पुढे गेली आणि अखेर २८ ऑगस्‍ट २०२२ रोजी हे टॉवर जमीनदोस्‍त करण्‍यावर शिक्‍कामोर्तब झाले.

सुपरटेक कंपनी दिवाळखोरी कशी निघाली ?

सुपरटेक कंपनीचे ट्विन टॉवर जमीनदोस्‍त करण्‍याचे आदेश सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले आणि त्‍यानंतर अरोरा यांच्‍या बांधकाम व्‍यवसायाची दुरावस्‍था झाली. सुमारे २०० कोटी रुपयांचा हा प्रकल्‍प होता. यातील ७११ फ्‍लॅटचे बुकिंग झाले होते. यासाठी पैसेही घेण्‍यात आले होते. मात्र, जेव्‍हा हे टॉवर जमीनदोस्‍त करण्‍याचे आदेश देण्‍यात आले. त्‍यावेळी सर्वोच्‍च न्‍यायालयाने फ्‍लॅटधारकांना बुकिंगवेळी दिलेल्‍या रक्‍कमेच्‍या १२ टक्‍के अधिक रक्‍कम व्‍याजासह ६५२ फ्‍लॅटधारकांना देण्‍याचे आदेश दिले होते. यातील ३०० फ्‍लॅटधारकांनी थेट पैसे घेतले. तर अन्‍य लोकांनी बाजारमुल्‍यांनुसार दुसर्‍या प्रोजेक्‍टमध्‍ये फ्‍लॅट घेतले.

ट्विन टॉवरमध्‍ये गुंतवणूक केलेल्‍या ५९ गुंतवणूकदारांना अद्‍याप पैसे मिळालेले नाहीत. २५ मार्च २०२२ रोजी सुपरटेक कंपनीच दिवाळखोरीत निघाली असून अद्‍याप १४ कोटी रुपये देणे बाकी आहे. कंपनीच दिवाळखोरीत निघाल्‍याने आमच्‍याकडे आता गुंतवणूकदारांना देण्‍यासाठी पैसेच नाहीत, असे कंपनीने न्‍यायालयास सांगितले. सुपरटेक कंपनीने युनियन बँकेकडून ४३२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तेही अदा न केल्‍याने या कंपनीविरोधात बँकेने याचिका दाखल केली होती. बँकेची न्‍याय बाजू मान्‍य करत न्‍यायालयाने कंपनी दिवाळखोरीत काढण्‍याची प्रक्रिया पूर्ण करा, असा आदेश दिला होता.

 

Back to top button