पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील दिग्गज मुष्टियोद्धांचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा मोहम्मद अली यांच्यानंतर एकच नाव समोर येते आणि ते नाव आहे अमेरिकन बॉक्सर माइक टायसनचे (Mike Tyson). 56 वर्षीय टायसन नुकताच मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीलचेअरवर दिसला. कधीकाळच्या या स्टार बॉक्सरला व्हीलचेअरवर पाहून चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. टायसनची तब्येत खूपच खराब असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे गांजाचे व्यसन. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टायसन प्रत्येक महिन्याला गांज्यावर लाखो रुपये खर्च करतो. तो स्वत: त्याच्या 420 एकर शेतात गांजाचे पीक घेतो. यासाठी त्याने कायदेशीर मान्यता देखील घेतली आहे. 'द बॅडेस्ट मॅन ऑन द प्लॅनेट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायसनला आरोग्याच्या समस्या असूनही हे व्यसन कमी होत नाहीय.
मायकेल जेरार्ड टायसन (Mike Tyson) याचा जन्म 30 जून 1966 रोजी न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथे झाला. माईक टायसन लहानपणापासूनच खूप खोडकर होता. तो तोतरा बोलत असल्याने काही लोक टायसनची चेष्टा करायचे. याचा टायसनला राग यायचा आणि तो त्या लोकांशी भांडायचा. कधी-कधी अशा भांडणाचे पर्यवसन हाणामारीत व्हायचे. वयाच्या 13 व्या वर्षीपर्यंत त्याला 38 वेळा अटक करण्यात आली होती.
बॉबी स्टड नावाच्या व्यक्तीने माईक टायसनची (Mike Tyson) प्रतिभा ओळखली आणि त्याला काही महिने प्रशिक्षण दिले. काही काळानंतर बॉबीने माइक टायसनची भेट अमेरिकन बॉक्सर के. डायमाटोशी घडवून आणली. डायमाटो हा एक बॉक्सर आणि मॅनेजर होता. त्याने माइक टायसनला असे प्रशिक्षण दिले की त्याच्या कारकिर्दीला नवीन वळण मिळाले.
1981 आणि 1982 च्या ज्युनियर ऑलिम्पिक स्पर्धेत माईक टायसनला (Mike Tyson) सुवर्णपदक मिळवण्यात यश आले. त्यानंतर 1984 मध्ये टायसनने न्यूयॉर्कमध्ये झालेल्या नॅशन गोल्डन ग्लोव्हजमध्ये जोनाथन लिटाला हरवून सुवर्णपदक जिंकले. हळूहळू माईक टायसनने बॉक्सिंगमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. 1985 मध्ये, वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी टायसनने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केले.
1987 मध्ये टायसनने सर्वात तरुण हेवीवेट चॅम्पियन बनण्याचा पराक्रम केला. तेव्हा तो फक्त 20 वर्षांचा होता. वादग्रस्त असूनही टायसनचा बॉक्सिंगमधील चमकदार प्रवास अव्याहतपणे सुरू राहिला. एक व्यावसायिक बॉक्सर म्हणून टायसन 58 सामने खेळला. त्यातील त्याने 50 सामने जिंकले आणि सहा गमावले. विशेष बाब म्हणजे टायसनने नॉकआउटद्वारे 44 सामने जिंकले आहेत.
बॉक्सिंगसोबतच माइक टायसन सतत वादात राहिला. 1992 मध्ये, माईक टायसन बलात्काराच्या आरोपात दोषी ठरला. त्या प्रकरणात त्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. मात्र, तीन वर्षांनीच त्याची पॅरोलवर सुटका झाली. १९९७ मध्ये एका सामन्यादरम्यान, टायसनने रागाने भरात प्रतिस्पर्धी बॉक्सर इव्हेंडर होलीफिल्डच्या कानाचा कठोरपणे चावा घेत त्याचा तुकडा बॉक्सिंग रिंगमध्ये थुंकला होता.
माइक टायसनचे वैयक्तिक जीवन यशस्वी झालेले नाही. त्याचे आतापर्यंत तीन वेळा लग्न झाले असून तो आठ मुलांचा बाप आहे. त्याचे पहिले लग्न 1988 मध्ये अभिनेत्री रॉबिन गिव्हन्सशी झाले, पण एका वर्षातच ते तुटले. त्यानंतर 1997 मध्ये मोनिका टर्नरसोबत त्याने लग्नगाठ बांधली. या नंतर 2003 मध्ये टायसनचे मोनिका टर्नरसोबत ब्रेकअप झाले. 2009 मध्ये टायसनने पुन्हा एकदा तिस-यांदा एल. स्पायसरशी लग्न केले, जे अजूनही कायम आहे.
2005 मध्ये डॅनी विल्यम्स आणि केविन मॅकब्राइड या बॉक्सर्सनी माइक टायसनचा पराभव केला. या नंतर त्याने बॉक्सिंगच्या रिंगला बाय-बाय करत निवृत्ती घेतली. टायसनला बॉक्सिंग रिंगमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी 'आयर्न माईक', 'किड डायनामाइट' आणि 'द बॅडेस्ट मॅन ऑन द प्लॅनेट' अशी टोपणनावे मिळाली. टायसन त्याच्या कृत्यांसाठी नक्कीच कुप्रसिद्ध आहे, परंतु बॉक्सिंग रिंगमधील त्याची उणीव चाहत्यांना भासत राहील यात शंका नाही.
हेही वाचा :