Asia Cup 2022 : आशिया कपसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा! ‘या’ खेळाडूंना मिळणार जागा | पुढारी

Asia Cup 2022 : आशिया कपसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा! ‘या’ खेळाडूंना मिळणार जागा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होणार आहे. या स्पर्धेवर क्रिकेट चाहत्यांच्या विशेष नजरा असणार आहेत कारण भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार असून हा महामुकाबला पहाण्यासाठी चाहते चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला असला तरी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही.

वृत्तानुसार, 8 ऑगस्ट (सोमवार) रोजी आशिया कप 2022 साठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत भारतीय चाहते आपल्या संघाची निवड होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, कोणत्या खेळाडूंना अंतिम 15 च्या संघात स्थान मिळणार हा सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय आहे.

केएल राहुलचे पुनरागमन…

हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून जवळजवळ सावरलेल्या केएल राहुलकडे संघात पुनरागमन करण्याची संधी आहे. राहुल आणि रोहित शर्मा सलामीला दिसू शकतात. राहुलने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पुनरागमन करणे अपेक्षित होते, परंतु कोरोना संसर्गामुळे त्याला पुन्हा बाहेर बसावे लागले. विराट कोहलीही विश्रांतीनंतर आशिया कपसाठी संघात परतणार आहे.

श्रेयस अय्यरचा पत्ता कट होण्याची शक्यता…

मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचा पत्ता कट होऊ शकतो. त्याच्या जागी दीपक हुड्डाला संधी मिळू शकते. श्रेयस अय्यरचा अलीकडचा फॉर्म तितकासा चांगला राहिलेला नाही. बाऊन्सरविरुद्ध तो अपयशी ठरतो हे समोर आले आहे. दुसरीकडे दिनेश कार्तिकने मधल्या फळीत आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. तर सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांची निवड केली जाईल यात शंका नाही.

दीपक चहरला लॉटरी लागणार!

हर्षल पटेलला दुखापत झाली आहे. त्याचा संघात समावेश होणे कठीण आहे. अशा परिस्थितीत दीपक चहरला झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेतील संघात स्थान मिळाले आहे. दीपक चहर व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग यांचीही वेगवान गोलंदाजीत निवड होण्याची शक्यता आहे. ऑफस्पिनरचा विचार केला तर रवींद्र जडेजा व्यतिरिक्त रविचंद्रन अश्विनला संघात स्थान मिळू शकते. यासोबतच लेगस्पिनर युजवेंद्र चहलही आशिया कपसाठी संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

आशिया चषक स्पर्धेसाठी संभाव्य 15 सदस्यीय भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, दीपक हुड्डा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, जसप्रीत बेशरम, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

Back to top button