Kapil Dev : वनडे आणि कसोटी क्रिकेट वाचवा, कपिल देव यांचे ICC ला आवाहन | पुढारी

Kapil Dev : वनडे आणि कसोटी क्रिकेट वाचवा, कपिल देव यांचे ICC ला आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील टी-20 लीग आयोजित केल्या जात आहेत. पुढील वर्षीपासून यूएई आणि दक्षिण आफ्रिकेतही अशा टी-20 लीग सुरू होतील. अशा स्थितीत वनडे आणि कसोटी क्रिकेटच्या भवितव्याबाबत नव्या वादाला तोंड फुटले आहे. अशातच भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी आयसीसीला वनडे आणि कसोटी फॉरमॅट वाचवण्याचे आवाहन केले आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

टी 20 लीगच्या वाढत्या वर्चस्वामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कॅलेंडरवर ताण आला आहे. त्यातच आता संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि दक्षिण आफ्रिकेत नवीन टी 20 लीगचा बिगुल वाजणार आहे. आयसीसीच्या पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरमध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL)ला एक मोठी विंडो दिली जाणार आहे, तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियालाही त्यांच्या देशांतर्गत फ्रँचायझी-आधारित लीगसाठी एक महत्त्वाचा स्लॉट मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत क्रिकेटचे वेळापत्रक खूपच व्यस्त झाले आहे आणि त्यामुळे काही खेळाडूंना एक किंवा दुसरा फॉरमॅट सोडावा लागला आहे. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. तर द. आफ्रिकेत सुरू होणारी नवी टी 20 लीग आणि ऑस्ट्रेलियातील वनडे मालिका एकाचवेळी येत असल्याने चक्क द. आफ्रिकेने हा दौराच रद्द केला आहे.

खेळाडूंच्या वर्कलोडचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी देशांतर्गत आणि द्विपक्षीय क्रिकेटमधील संतुलन शोधण्याचे काम आयसीसीने संबंधित क्रिकेट बोर्डांवर सोडले आहे. परंतु कपिल देव (Kapil Dev) यावर नाराज झाल्याचे समजते. ते म्हणाले की, खेळाचे व्यवस्थापन करणे ही आयसीसीची जबाबदारी आहे. मात्र, युरोपमध्ये ज्याप्रकारे फुटबॉलच्या बाबतीत घडत आहे त्याप्रमाणे सध्या क्रिकेटमध्ये सुरुवात झाली आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतच फक्त एका देशाचा संघ दुस-या देशाच्या संघाविरुद्ध खेळतो. मात्र, हे फक्त चार वर्सातून एकदाच घडते. एरव्ही त्या-त्या संघातील खेळाडू लिग स्पर्धांमध्ये विविध क्लब संघांचे प्रतिनिधित्व करतात. ‘वनडे आणि कसोटी क्रिकेटची वाटचाल ही फुटबॉलच्या मार्गावर सुरू आहे. टी-२० लीगच्या वाढत्या प्रभावादरम्यान आयसीसीने वनडे आणि कसोटी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे’, असे त्यांनी म्हटले.

वाढत्या टी-20 लीग आणि क्रिकेटचा परिणाम दिसून येत आहे. काही खेळाडूंनी क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकाचे कारण देत अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. यात बेन स्टोक्ससारख्या खेळाडूंचा समावेश आहे. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेने 2023 मध्ये होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका रद्द केली, कारण त्या मालिकेची तारीख आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रस्तावित टी-20 लीगच्या तारखांची टक्कर होत होती.

1983 मध्ये देशाला विश्वचषक जिंकून देणा-या संघाचे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) पुढे म्हणाले की, आपण वर्ल्डकप आणि बाकी वेळेत क्लब क्रिकेट (टी20 फ्रेंचायजी) एवढेच खेळायचे आहे का? प्रमाणे क्रिकेटमध्येही दोन आम्ही विश्वचषकात उर्वरित वेळ क्लब (टी-20 फ्रँचायझी) क्रिकेट खेळणार आहोत का? त्याचप्रमाणे क्रिकेटपटू मुख्यतः आयपीएल खेळणार आहेत का? विविध देशांतील स्टार क्रिकेटपटू आयपीएल किंवा बिग बॅश किंवा तत्सम लीगमध्येच खेळणार का? असे सवाल उपस्थित करून कपिल देव यांनी केवळ क्लब क्रिकेटच नव्हे तर एकदिवसीय क्रिकेट, कसोटी क्रिकेटचे अस्तित्व कसे सुनिश्चित करता येईल हे पाहण्यासाठी आयसीसीला यात अधिक वेळ घालवावा लागेल, असा सल्ला क्रिकेटच्या शिखर संस्थेला दिला आहे.

Back to top button