ZIM vs IND : टीम इंडीयामध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदची एन्ट्री, बीसीसीआयने घोषणा | पुढारी

ZIM vs IND : टीम इंडीयामध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदची एन्ट्री, बीसीसीआयने घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : झिम्बाब्वेविरुद्ध या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. जखमी वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अष्टपैलू शाहबाज अहमदचा समावेश करण्यात आला आहे. 27 वर्षीय शाहबाज भारतीय संघाचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या शाहबाजला यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून केलेल्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे.

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी

बंगालच्या या डावखुऱ्या फिरकीपटूने आयपीएलमधील 16 सामन्यांत 219 धावा केल्या आणि चार विकेट घेतल्या. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने एका निवेदनात म्हटले की, ‘झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदची निवड केली आहे. वॉशिंग्टनला इंग्लंडमध्ये कौंटी सामना खेळताना खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर पडला.’

सुंदर सतत जखमी होत आहे…

जुलै 2021 पासून वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतींना सुरुवात झाली. भारताविरुद्ध कौंटी संघाकडून सराव सामना खेळताना त्याला दुखापत झाली. मोहम्मद सिराजने फेकलेल्या चेंडूवर त्याचे बोट फ्रॅक्चर झाले. त्यानंतर कोरोनामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. फेब्रुवारी-मार्चमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर तो हॅमस्ट्रिंगमुळे टी-20 मालिका खेळू शकला नव्हता. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही त्याला बाहेर बसावे लागले होते. आयपीएलमध्येही तो दुखापतीमुळे सनरायझर्स हैदराबादकडून पाच सामने खेळू शकला नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी होणार आहे. पण या मालिकेपूर्वीही सुंदर दुखापतीमुळे भारतीय संघाचा भाग असणार नाही.

आणखी वाचा :

Back to top button