FIFA : फिफाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव; बुधवारी होणार सुनावणी | पुढारी

FIFA : फिफाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव; बुधवारी होणार सुनावणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक फुटबॉल प्रशासकीय समितीने (FIFA) तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपामुळे भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) तत्काळ निलंबित केले आहे. फिफाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात केंद्र सरकार आक्रमक झाले आहे. केंद्राने या प्रकरणावर आज (दि.१६) लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज सुनावणी घेण्याची मागणी केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि.१७) सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

FIFA फिफाच्या चेतावनीकडे दुर्लक्ष करा : सुनील छेत्री

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि दिग्गज स्ट्रायकर सुनील छेत्रीने रविवारी आपल्या सहकारी खेळाडूंना सांगितले होते की, भारतीय फुटबॉलला निलंबित किंवा बंदी घालण्याच्या फिफाच्या  (FIFA) धमक्यांकडे लक्ष किंवा महत्व देण्याची गरज नाही. तुम्ही मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर द्या, असे त्याने खेळाडूंना सांगितले.

11 ऑक्टोबरपासून सुरू होणार होता 17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक

17 वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर, गोवा आणि मुंबई येथे होणार होती. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तरदायित्व पत्रावर स्वाक्षरी करून आधीच मान्यता दिली होती. मात्र, आता फिफाच्या बंदीमुळे 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणारा आगामी FIFA U-17 महिला विश्वचषक पुढे ढकलली जाणार आहे. स्पर्धेचे भवितव्य योग्य वेळी ठरवले जाईल आणि गरज भासल्यास हे प्रकरण ब्युरो ऑफ कौन्सिलकडे पाठवले जाईल, असे फिफाने म्हटले आहे. आता ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार भारतात होऊ शकत नाही, असे फिफाने स्पष्टपणे सांगितले आहे. भारतीय फुटबॉल महासंघाने एकत्रितपणे काम केले तरच निलंबन मागे घेतले जाईल, असे देखील फिफाने म्हटले आहे.

Back to top button