FIFA : फिफाचा भारताला मोठा धक्का : भारतीय संघाला केले निलंबित | पुढारी

FIFA : फिफाचा भारताला मोठा धक्का : भारतीय संघाला केले निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफाने (FIFA) तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपामुळे भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) तत्काळ निलंबित केले आहे. फिफाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, मंगळवार, 16 ऑगस्टपासून कोलकातामध्ये ड्युरंड चषक सुरू होत आहे. यामध्ये दुसऱ्या दिवशी बंगळुरू एफसीचा सामना जमशेदपूर एफसीशी होणार आहे.

माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला फिफाने तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपामुळे भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) निलंबित करण्याची चेतावनी दिली होती. यासोबतच ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिला अंडर-17 विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचा हक्क काढून घेण्याची चेतावनी फिफाने दिली आहे. न्यायालयाने एआयएफएफला (AIFF) निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर काही दिवसांनी हा इशारा देण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने (COA) निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. ही निवडणूक 28 ऑगस्ट रोजी होणार आहे.

फिफाच्या चेतावनीकडे दुर्लक्ष करा : सुनील छेत्री

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि दिग्गज स्ट्रायकर सुनील छेत्रीने रविवारी आपल्या सहकारी खेळाडूंना सांगितले होते की, भारतीय फुटबॉलला निलंबित किंवा बंदी घालण्याच्या फिफाच्या धमक्यांकडे लक्ष किंवा महत्व देण्याची गरज नाही. तुम्ही मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर द्या, असे त्याने खेळाडूंना सांगितले.

11 ऑक्टोबरपासून सुरू होणार होता 17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक

17 वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वचषक 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर, गोवा आणि मुंबई येथे होणार होता. त्याच्या ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तरदायित्व पत्रावर स्वाक्षरी करून आधीच मान्यता दिली होती. मात्र, आता फिफाच्या बंदीमुळे 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणारा आगामी FIFA U-17 महिला विश्वचषक पुढे ढकलला जाणार आहे. स्पर्धेचे भवितव्य योग्य वेळी ठरवले जाईल आणि गरज भासल्यास हे प्रकरण ब्युरो ऑफ कौन्सिलकडे पाठवले जाईल, असे फिफाने म्हटले आहे. आता ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार भारतात होऊ शकत नाही, असे फिफाने स्पष्टपणे सांगितले आहे. भारतीय फुटबॉल महासंघाने एकत्रितपणे काम केले तरच निलंबन मागे घेतले जाईल, असे देखील फिफाने म्हटले आहे.

Back to top button