Suryakumar Yadav : 'सुर्याला बर्बाद करू नकोस', के. श्रीकांत रोहित शर्मावर भडकले | पुढारी

Suryakumar Yadav : 'सुर्याला बर्बाद करू नकोस', के. श्रीकांत रोहित शर्मावर भडकले

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी क्रिकेटर कृष्णमाचारी श्रीकांत यांनी सध्याचा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर जोरदार टीका केली आहे. केएल राहुलच्या अनुपस्थित सुर्या (Suryakumar Yadav) रोहित शर्मासोबत ओपनिंगला येत आहे. भारतीय कर्णधाराच्या याच निर्णयावर माजी क्रिकेटर श्रीकांत चांगलेच भडकले आहेत. सूर्यकुमार यादवला बर्बाद करू नकोस, अशी संतप्त प्रतिक्रिया देत रोहित शर्माचे कान टोचले आहेत.

श्रीकांत म्हणाले की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) रोहितसोबत डावाची सुरुवात केली. पहिल्या सामन्यात सूर्याने 16 चेंडूत 24, तर दुसऱ्या सामन्यात तो 6 चेंडूत 11 धावा करून बाद तो झाला. सूर्या हा आघाडीचा फलंदाज आहे. तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर येत धडाकेबाज फलंदाजी करतो. मात्र, विंडीविरुद्धच्या टी 20 मालिकेत राहुलच्या अनुपस्थितीत तो डावाची सुरुवात करत आहे. अशाप्रकारे सूर्यकुमार यादवचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी श्रीकांत म्हणाले, ‘सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टी-20 विश्वचषक 2022 मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा सर्वोत्तम खेळाडू असेल. मग त्याने डावाची सुरुवात करावी असे तुम्हाला का वाटते? जर तुम्हाला एखाद्या फलंदाजाने डावाची सुरुवात करायची असेल तर श्रेयस अय्यरला डावलून इशान किशनला संघात स्थान द्या. सूर्यकुमारसारख्या खेळाडूला वाया घालवू नका. मी तुम्हाला सांगतोय की, दोन वाईट खेळीनंतर सूर्यकुमार यादवने आत्मविश्वास गमावल्यावर काय होईल?’ असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

ते काहीही असो, मी ते समजून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरलो. जर तुम्ही काही सामन्यांसाठी सलामीवीर म्हणून ऋषभ पंतचा वापर करण्याची योजना आखत असाल तर तुम्ही आज त्याचा वापर करायला हवा होता. त्याला किमान पाच संधी द्या, असेही श्रीकांत यांनी म्हटले.

मोहम्मद कैफनेही सूर्यकुमार ओपनिंगला मैदानात उतरल्यावर आश्चर्य व्यक्त केले होते. भारताने इंग्लंडमध्ये ऋषभ पंतसह डावाची सुरुवात केली, तर इशान किशन डगआउटमध्ये बसला होता. त्याचवेळी संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला याबाबत प्रश्न विचारला असता त्यानेही सडेतोड उत्तर दिले आहे. भुवी म्हणाला होता की, हे का केले गेले हे मला माहित नाही, परंतु मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा या रणनिती मागे काही तरी खास विचार असेल असे त्याने म्हटले.

Back to top button