Obed McCoy : भारताविरुद्ध ‘असा’ षटकार मारणारा ओबेड मॅकॉय पहिला क्रिकेटर! | पुढारी

Obed McCoy : भारताविरुद्ध ‘असा’ षटकार मारणारा ओबेड मॅकॉय पहिला क्रिकेटर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिज संघाचा वेगवान गोलंदाज ओबेड मॅकॉयने (Obed McCoy) भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चार षटकात केवळ 17 धावा देत एकूण सहा विकेट घेतल्या. भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहा विकेट घेणारा मॅकॉय हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांना मॅकॉयने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मॅकॉयने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर रोहितला माघारी धाडले.

यापूर्वी, भारताविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम श्रीलंकेचा वनिंदू हसरंगाच्या नावावर होता. त्याने 2021 मध्ये कोलंबोमध्ये 9 धावा देऊन 4 बळी घेतले होते. जगातील कोणत्याही गोलंदाजाने भारताविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले नव्हते. टीम इंडियाच्या फलंदाजांकडे मॅकॉयच्या (Obed McCoy) भेदक मा-या समोर टीकाव लागला नाही आणि टीम इंडियाला संपूर्ण 20 षटकेसुद्धा खेळता आले नाहीत.

टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 19.4 षटकात केवळ 138 धावांवर गारद झाला. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 31 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 19.2 षटकांत 5 बाद 141 धावा करून सामना जिंकला. विंडीजकडून ब्रँडन किंगने सर्वाधिक 68 धावा केल्या. त्याचवेळी डेव्हन थॉमसने 31 धावांची नाबाद खेळी खेळली. या विजयासह विंडीजने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मॅकॉयला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पाचपेक्षा जास्त विकेट्स घेण्याची मॅककॉयची (Obed McCoy) ही पहिलीच वेळ आहे. याच मैदानावर मंगळवारी टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार आहे.

टी-20 सामन्यात 17 धावांत सहा विकेट्स ही वेस्ट इंडिजच्या कोणत्याही गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी हा विक्रम कीमो पॉलच्या नावावर होता. पॉलने 2018 मध्ये मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध 15 धावांत पाच विकेट घेतल्या होत्या.

Back to top button