टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध विजयाचे ‘शतक’ झळकवण्याची संधी! | पुढारी

टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध विजयाचे ‘शतक’ झळकवण्याची संधी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज 14 जुलै रोजी लंडनमधील ऐतिहासीक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. तर तिसरा सामना 17 जुलैला होणार आहे. दरम्यान, भारतीय संघाने या दोन्ही सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवल्यास एका मोठ्या विक्रमाची नोंद होणार असून इंग्लंडविरुद्ध विजयाचे शतक झळकवण्याची संधी चालून आली आहे.

भारताने आतापर्यंत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 56 सामन्यांमध्ये इंग्लंडचा पराभव केला आहे, तर कसोटी क्रिकेटमध्ये भारताने इंग्लिश संघाविरुद्ध 31 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, भारतीय क्रिकेट संघाने 22 सामन्यांमध्ये इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आहे. आतापर्यंत भारताने इंग्लंडविरुद्ध 99 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत.

त्याचबरोबर इंग्लंडच्या संघाने भारताविरुद्ध 50 कसोटी, 43 वनडे आणि 10 टी-20 सामने जिंकले आहेत. भारताविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडने विजयाचे शतक पूर्ण केले आहे. अशा परिस्थितीत आता इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम करण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतील दोन सामने अजून खेळायचे असल्याने भारताला हा टप्पा गाठण्यासाठी दोन संधी आहेत. मालिकेतील पहिला सामना भारताने 10 विकेट राखून जिंकला आहे.

आणखी वाचा

Back to top button