Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह बनला वनडेचा अव्वल गोलंदाज | पुढारी

Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह बनला वनडेचा अव्वल गोलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (jasprit bumrah) पुन्हा एकदा दणका दिला आहे. दोन वर्षांनंतर तो पुन्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर 1 गोलंदाज बनला असून त्याने सर्वांनाच मागे टाकले आहे. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल मैदानावरील एकदिवसीय सामन्यात बुमराहला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा फायदा झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी वनडे खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) 718 गुणांसह नंबर 1 गोलंदाज ठरला आहे. मंगळवारी (12 जुलै) झालेल्या ओव्हल वनडेत त्याने 19 धावांत 6 बळी घेतले. या कामगिरीमुळे बुमराहने पाच स्थानांची झेप घेतली.

बुमराह दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा नंबर-1 गोलंदाज

बुमराह (jasprit bumrah) दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी त्याने फेब्रुवारी 2020 मध्ये नंबर-1 चा मुकुट गमावला होता. त्यावेळी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने त्याला मागे टाकून पहिला क्रमांका पटकावला होता. आता बुमराहने पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर कब्जा मिळवला आहे. अशी कामगिरी करणारा बुमराह पहिला भारतीय ठरला आहे.

बुमराह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्‍येही नंबर-1 गोलंदाज ठरला आहे. मात्र, सध्याच्या क्रमवारीत तो 28 व्या स्थानी आहे. कसोटीत बुमराह त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बुमराह कपिल देव नंतर दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज आहे जो वनडेमध्ये नंबर-1 बनला आहे. बुमराह आणि कपिल देव यांच्या व्यतिरिक्त, मनिंदर सिंग, अनिल कुंबळे आणि रवींद्र जडेजा हे देखील जगातील नंबर-1 चे गोलंदाज ठरले होते.

शमीला चार स्थानांचा फायदा

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल वनडेत तीन विकेट घेतल्या. याचा त्याला रँकिंगमध्ये फायदा झाला. शमीने चार स्थानांची झेप घेतली असून तो आता 23 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. याशिवाय फिरकीपटू रवींद्र जडेजाला 6 स्थानांचे नुकसान झाले आहे. तो 40 व्या क्रमांकावर घसरला आहे.

टीम इंडियाची इंग्लंडवर 10 विकेट्सने मात

ओव्हल एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 110 धावांवर गुंडाळला. संघाकडून कर्णधार जोस बटलरला केवळ 30 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 114 धावा करत हा सामना 10 गडी राखून जिंकला. सलामीवीर रोहित शर्मा नाबाद 76 आणि शिखर धवनने 31 धावा केल्या. या सामन्यात बुमराहने 7.2 षटके टाकत 19 धावांत 6 मोठे बळी घेतले. बुमराहला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Back to top button