

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघात पुनरागमन केले आहे. मंगळवारी तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सलामीला येईल अशी दाट शक्यता आहे. शिखर धवन गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला टी 20 (T20) संघामध्ये स्थान मिळत नाहीये. धवनला टी-20 संघात संधी दिली जाणार नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. त्याला फक्त एकदिवसीय संघात स्थान मिळेल. अशा स्थितीत तो या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या संघात टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
धवननेही (Shikhar Dhawan) ही गोष्ट मान्य केली आहे. त्यामुळेच आता त्याला पुढील वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे आणि त्यासाठी त्याने एक योजनाही तयार केली आहे. इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी शिखर धवनने विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू केल्याचे सांगितले आहे.
धवन (Shikhar Dhawan) म्हणाला, 'इंग्लंड दौऱ्यापूर्वी चांगली तयारी करणे मी आवश्यक मानतो. म्हणूनच मी माझ्या शैलीवर आणि इतर सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. या मालिकेसाठी मी खूप पूर्वीपासून तयारी सुरू केली होती. मला खात्री आहे की मी फॉर्ममध्ये असेन. तसेच, माझे लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे. यासाठी मला आणखी सामने खेळायचे आहेत, असे त्यांनी व्यक्त केले आहे.
धवन पुढे म्हणाला की, मला अधिकाधिक एकदिवसीय सामने खेळून माझी गती कायम ठेवायची आहे. दरम्यान, आयपीएलही होणार आहे. अशा परिस्थितीत या स्पर्धेतही चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी मी शक्य तितके देशांतर्गत वनडे आणि टी-20 सामने खेळेन,' असेही धवनने म्हटले.
इंग्लंडसोबतची मालिका संपल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौ-यत शिखर धवनला वनडे मालिकेत भारताचा कर्णधार बनवण्यात आले आहे. अशा स्थितीत इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका धवनसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. धवन पाच महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करत आहे.