Sri Lanka W vs India W : भारतीय महिला संघाकडून श्रीलंकेला व्हाईट व्हॉश! तिसऱ्या सामन्यात ३९ धावांनी विजय | पुढारी

Sri Lanka W vs India W : भारतीय महिला संघाकडून श्रीलंकेला व्हाईट व्हॉश! तिसऱ्या सामन्यात ३९ धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाच्या (Sri Lanka W vs India W) सर्व प्रकारातील कर्णधार बनल्यानंतर हरमनप्रीत कौर ॲन्ड कंपनीने आपल्या पहिल्या दौऱ्यात दमदार कामगिरी बजावली आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेला प्रथम टी २० मालिकेत आणि आता एकदिवसीय मालिकेत सुपडासाफ केला. भारतीय संघाने श्रीलंकेला एकदिवसीय मालिकेत ३-० अशी मात देत निर्भेळ यश प्राप्त केले. तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेसमोर २५६ धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान पेलू न शकलेल्या श्रीलंका संघाला भारताने ४७.३ षटकात २१६ धावातच संपूर्ण संघास गारद केले.

तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने (Sri Lanka W vs India W) नाणेफेक जिंकत पाहुण्या भारतीय संघास प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. या आधीचे दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या ७५ धावांच्या बळावर ५० षटकात ९ बाद २५५ धावांपर्यंत मजल मारली. हरमनप्रीतला पूजा वस्त्रकारने मोलाची साथ दिली. तिने ५६ धावांची खेळी करुन नाबाद राहिली.

दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाकडून रनवीरा, रश्मी डी सिल्वा आणि अट्टापटू यांनी चांगली गोलंदाजी केली. या तिघीनी तीन-तीन बळी घेतले. तर भारताकडून राजेश्वरी गायकवाड हिने तीन बळी तर मेघना सिंह आणि पुजा वस्त्रकार यांनी २-२ बळी घेतले. कर्णधार हरमनप्रीत कौर हिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तिने ८८ चेंडूत ७५ धावांचे योगदान दिले.

भारताने आधीचे दोन सामने जिंकत आधीच मालिका जिंकली होती. अंतिम सामना जिंकत श्रीलंकेला व्हाईट व्हॉश देण्यात भारत यशस्वी ठरला. दुसऱ्या सामान्यात भारताने नाबाद १७४ धावा करत श्रीलंकेवर एकतर्फी विजय नोंदवला होता. या सामन्यात स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा हिने सर्वश्रेष्ठ कामगिरी बजावली होती.

अधिक वाचा :

Back to top button