India vs Pakistan T20 : भारत-पाकचे क्रिकेटच्या खेळपट्टीवर युद्ध! 28 ऑगस्टला रंगणार सामना | पुढारी

India vs Pakistan T20 : भारत-पाकचे क्रिकेटच्या खेळपट्टीवर युद्ध! 28 ऑगस्टला रंगणार सामना

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या दारूण पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाला मिळाली आहे. 28 ऑगस्टला आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. यावेळी आशिया चषक स्पर्धेचे आयोजन श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) करत आहे. श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ऍशले डी सिल्वा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, स्पर्धेचे सामने वेळापत्रकानुसारच होतील. त्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेलाही आम्ही तयार केले आहे. (Asia Cup 2022 India vs Pakistan T20 Match Likely To Play On August 28)

भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. आता उभय देशांचे संघ लवकरच क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांशी लढताना दिसणार आहेत. 27 ऑगस्टपासून आशिया चषक टी-20 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 टी-20 सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने 6 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानने 2 सामन्यात विजय मिळवला आहे.

विश्वचषक स्पर्धेत भारताचा पराभव

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेत झाला होता. त्यावेळी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील खेळणा-या पालने भारतावर 10 गडी राखून मात केली होती.

आशिया चषक 2022 साठी यजमान श्रीलंकेसह टीम इंडिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशने आपले स्थान निश्चित केले आहे. त्याचबरोबर यूएई, नेपाळ, ओमान, हाँगकाँग आणि इतर संघांमध्ये क्वालिफायर सामने खेळवले जातील. हे सामने 21 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, मुख्य सामने 27 ऑगस्टपासून सुरू होऊ शकतात.

यंदाची स्पर्धा T20 फॉरमॅटमध्ये

यंदा आशिया चषकाचे सामने टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार आहेत. यापूर्वी ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळली जात होती. भारतीय संघाने पाच वेळा आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तर पाकिस्तानने केवळ दोनदा आशिया कप जिंकला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आपले विजेतेपद राखण्यासाठी उतरणार आहे. टीम इंडियाने गेल्या वेळी बांगलादेशला हरवून जेतेपदावर कब्जा केला होता. (Asia Cup 2022 India vs Pakistan T20 Match Likely To Play On August 28)

Back to top button