एजबस्टनवरील अपयशाने भारताचे ‘गणित’ अवघड | पुढारी

एजबस्टनवरील अपयशाने भारताचे ‘गणित’ अवघड

बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मागील वर्षी इंग्लंड दौर्‍यावर 2-1 अशी आघाडी घेतली होती. परंतु या मालिकेतील पाचव्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्याचा मार्गही खडतर झाला आहे.

या पराभवानंतर भारतीय संघ 77 गुणांसह वर्ल्डकप चॅम्पियनशिप गुणतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडने 64 गुणांसह सातव्या स्थानावर कूच केली आहे. ऑस्ट्रेलिया 84 गुण व 77.78 टक्क्यांसह अव्वल, तर दक्षिण आफ्रिका 60 गुण व 71.43 टक्क्यांसह अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या क्रमांकावर आहे.

राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर भारताने परदेशात गमावलेली ही दुसरी मालिका आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर भारताला सपाटून मार खावा लागला होता. त्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 2-1 असे आघाडीवर असूनही टीम इंडियाला 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. दक्षिण आफ्रिका दौर्‍यावरील कसोटी मालिका गमावणेही भारताला महागात पडले आहे. आफ्रिकेविरुद्ध भारताला 240 व 212 धावांचा यशस्वी बचाव करता आला नाही. इंग्लंडविरुद्ध तर चौथ्या डावात भारताने 378 धावा दिल्या.

भारताचे किती सामने शिल्लक?

भारत आता बांगलादेशात 2 कसोटी सामने खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर 4 सामने खेळणार आहे. आता भारताला बांगला देश दौर्‍यावरील दोन्ही कसोटी व मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चारही कसोटी जिंकाव्या लागतील, तर आणि तरच ते जागतिक कसोटीच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकणार आहेत.

हेही वाचा

Back to top button