कोल्हापूरसह कोकणला ‘रेड अलर्ट’ | पुढारी

कोल्हापूरसह कोकणला ‘रेड अलर्ट’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुजरात ते महाराष्ट्राची किनारपट्टी आणि पूर्व राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंतच्या भागात दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे कोकणसह कोल्हापूर व सातारा या भागात अतिमुसळधार (रेड अलर्ट) पाऊस बरसणार असून, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात 6 ते 8 जुलै हे तीन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकणात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे कोकणच्या बहुतांश भागात गावागावांत पुराचे पाणी शिरले आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातही अतिवृष्टी झाली आहे, तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात त्यातुलनेत सध्या पाऊस कमी प्रमाणात बरसत आहे.

रेड अलर्ट ः पालघर (8 जुलै), रायगड (6 ते 8 जुलै), रत्नागिरी (6 ते 8 जुलै), कोल्हापूर (6 ते 8 जुलै), सातारा (6 ते 8 जुलै).

गोव्यात पावसाचा कहर

पणजी : राज्यात सोमवारी सुरू झालेला पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिला. मंगळवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या चोवीस तासामध्ये 6.14 इंच पाऊस कोसळला. पाच वर्षांतील ही एका दिवसातील सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती गोवा वेधशाळेने दिली आहे.

चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी

सांगली ः दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात मंगळवारी मान्सूनचे आगमन झाले. जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले. उर्वरित खरीप पेरणीस वेग येणार आहे. तसेच चांदोली, कोयना धरण परिसरातही अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा गतीने वाढू लागला आहे.

कुंभार्ली घाटात दरड कोसळली

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. परशुराम घाटात दोनदा दरड कोसळल्याने हा घाट रेड अलर्ट असेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, तर महामार्गावरील वाहतूक चिरणीमार्गे वळविण्यात आली आहे.

दुसरीकडे चिपळूण-कराड रोडवर दरड कोसळल्याने काही काळ हा मार्ग बंद होता. जेसीबीच्या साहाय्याने दरड तत्काळ बाजूला केल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली. रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारीही दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील जलस्तर वाढू लागला असून, चार नद्यांनी इशारा पातळीही ओलांडली.

60 गावांना उधाणाचा धोका
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील 60 गावे सागरी उधाणाच्या छायेत असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

वैभववाडीत 240 मि.मी. पाऊस
कणकवली : गेल्या चोवीस तासांत वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 240.3 मि.मी. पावसाची नोंद झाली.

कोकण, मुंबईत धुवाँधार; रेल्वे सेवेवर परिणाम

मुंबई शहरासह उपनगरात मंगळवारी पावसाच्या चौकार-षटकारांच्या फटकेबाजीमुळे मुंबई चहूकडे पाणीच पाणी झाले. ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामध्ये अनेक मोटारसायकली आणि चारचाकी वाहने बंद पडली. नागरिकांनीही आपला जीव धोक्यात घालून सुमारे तीन ते चार फूट पाण्यातून वाट काढत घर गाठले. मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकावरही मोठा परिणाम झाला. लोकल गाड्यांचा वेग मंदावल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कोकणात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गासह मुंबईतील लहान-मोठे रस्ते वाहतूक कोंडीत सापडले होते. 25 ते 30 ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पडल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. ही झाडे पालिकेने तातडीने हटवली. संततधारेमुळे वाहनांचा वेग मंदावला होता.

लोकल 20-25 मिनटे विलंबाने

धुवाँधार पावसामुळे द़ृश्यमानता कमी झाल्याने मध्य रेल्वेवरील मोटारमनना लोकल चालवताना अडचण येत होती. परिणामी, लोकल 20-25 मिनिटे विलंबाने धावत होत्या. परिणामी, स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी होती. चेंबूर येथील पोस्टल कॉलनी परिसरात तीन ते चार फूट पाणी भरले आहे. त्यामुळे रहिवासी घरे सोडून निघून गेले आहेत.

Back to top button