भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीर याच्यावर सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव होत आहे. गौतम गंभीर हा पूर्व दिल्लीचा खासदार आहे. तो आपल्या खासदारकीच्या माध्यमातून आपल्या मतदार संघात अनेक उपक्रम राबत असतो. असेच त्याच्या एका उपक्रमाचे सध्या सोशल मीडियात कौतुक होत आहे.
खासदार गौतम गंभीर आपल्या मतदार संघात जन रसोयई हा उपक्रम राबवतो. या उपक्रमाअंतर्गत फक्त १ रुपयात भुकेल्यानां जेवण देण्यात येते. गौतम गंभीर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मतदार संघात हा उपक्रम राबवत आहेत. गौतम गंभीरच्या या जन रसोईची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेण्यात आली आहे.
आता गंभीरचा हा उपक्रम वेगळ्याच उंचीवर पोहचला आहे. त्याने आज ( दि. २० ) आपल्या मतदार संघात तिसरी जन रसोई विनोद नगर येथे सुरु केली आहे. या रसोईमधून आता दिवसाला १ हजार लोकांना १ रुपयात जेवण देणार आहे. गंभीरने यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गांधीनगर येथे जन रसोई सुरु केली होती. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याने अशोक नगरमध्ये दुसरी जन रसोई सुरु केली.
खासदार गौतम गंभीर याचा जन रसोई सुरु करण्यामागे गरीब लोकांना सन्मान आणि पोषणयुक्त जेवण उपलब्ध व्हावे असा उद्येश आहे. तो या बाबत म्हणाला की, 'आम्ही या योजनेअंतर्गत गरीब लोकांकडून नाममात्र १ रुपया घोतो. आमचे स्वयंमसेवक इथे कोणीही येऊन पोटभर जेवण करु शकतील याची काळजी घेतात.'
गंभीरने येणाऱ्या काही दिवसात या उपक्रमाअंतर्गत अजून काही जन रसोई सुरु करणार असल्याचेही सांगितले. त्याने पटपडगंज विधानसभा मतदार संघाकडे दिल्लीचे राज्यसरकार कायम दुर्लक्ष करते असा आरोप केला. तसेच त्याने या भागातील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांवरचा आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
तो म्हणाला 'झोपड्यामध्ये राहणाऱ्या लोकांवरील आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यासाठीच त्यांना पोषक आहार देण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून या लोकांना भूक भागवण्यासाठी भटकावे लागू नये. भविष्यात अनेक जन रसोई उभारल्या जातील जेणेकरुन दिल्लीत कोणी भुकेला राहू नये.'
खासदार गौतम गंभीरच्या या उपक्रमाचे सोशल मीडियाच खूप कौतुक होत आहे. त्याचा जुना संघ सहकारी हरभजन सिंगनेही त्याच्या या उपक्रमाचे ट्विट करुन कौतुक केले.