WTC Points ही गेले, दंडही लागला; टीम इंडियाला मोठा धक्का | पुढारी

WTC Points ही गेले, दंडही लागला; टीम इंडियाला मोठा धक्का

लंडन; पुढारी ऑनलाईन : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीबरोबरच WTC Points Table ही ॲक्टिव्ह झाले आहे. नॉटिंगहॅम येथे खेळवण्यात आलेला सामना ड्रॉ झाला. त्यामुळे दोन्ही संघाला प्रत्येकी ४ गुण देण्यात आले. परंतु आयसीसीने टीम इंडिया आणि इंग्लंड संघावर कारवाई केल्यामुळे हे गुण कमी झाले आहेत.

आयसीसीने टीम इंडिया आणि इंग्लंड संघाचे WTC Points षटक टाकण्याची गती मंद ठेवल्याने कापले. दोन्ही संघाचे प्रत्येकी २ गुण कापण्यात आले. याचबरोबर दोन्ही संघांना दंडही ठोठावला. यंदाच्या WTC Points नियमात अनेक बदल करण्यात आले आहेत. यानुसार आता सामना जिंकणाऱ्याला १२ गुण मिळणार आहेत.  सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना ४-४ गुण मिळणार आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे सामना ड्रॉ झाला. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारत मजबूत स्थितीत होता. त्यामुळे भारताचे ८ गुणांचे नुकसान झाले. दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपअंतर्गत भारत ६ कसोटी मालिका खेळणार आहे. यातील तीन मालिका विदेशात तर ३ मालिका मायदेशात खेळणार आहे.

भारत सध्या इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. त्यानंतर भारत बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. मायदेशात भारत श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.

षटकांची मंद गती भोवली

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांची षटकांची गती मंद होती. त्यामुळे दोन्ही संघांना ४० टक्के सामना शुल्क दंड म्हणून कापण्यात आले आहे.

याचबरोबर सामनाधिकारी ब्रॉडने दोन्ही संघाच्या WTC Points मधून प्रत्येकी २ गुण कापले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना २०२३

पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंड आणि भारत एकमेकांना भिडले होते.

हा अंतिम सामना इंग्लंडमध्ये झाला होता. न्यूझीलंडने भारताला मात देत पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले.

आता दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना २०२३ मध्ये खेळला जाईल.

हेही वाचलं का? 

पाहा व्हिडिओ : पुण्याच्या निकिताने केला भरतनाट्यममध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

Back to top button