ENG vs IND : लॉर्डस्वर शतकाचा कोहली, पुजाराचा इरादा | पुढारी

ENG vs IND : लॉर्डस्वर शतकाचा कोहली, पुजाराचा इरादा

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांना लॉर्डस्वर ( ENG vs IND ) कसोटी शतक झळकावता आलेले नाही. दिलीप वेंगसरकर यांच्या नावे सलग तीन शतक झळकावण्याचा विक्रम आहे. त्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांचा प्रयत्न उद्यापासून सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटीत या मैदानावर शतक झळकावण्याचा असणार आहे.

कोहलीला गेल्या 9 कसोटी सामन्यांतील 15 डावांत शतक करता आलेले नाही. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 27 शतके आहेत. मात्र, नोव्हेंबर 2019 नंतर त्याला तिहेरी आकड्यांपर्यंत पोहोचता आलेले नाही.

भारतीय संघ गुरुवारी दुसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्यात लॉर्डस्वर ( ENG vs IND ) इंग्लंडविरुद्ध खेळेल. लॉर्डस्वर भारताच्या दिग्गज फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही. गावस्कर यांनी या मैदानावार 10 डावांत 340 धावा केल्या आहेत.

तेंडुलकरने 9 कसोटी डाव खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला कधीही 50 धावा करता आलेल्या नाहीत. भारतीय कर्णधार कोहलीने आतापर्यंत लॉर्डस्वर चार डाव खेळले आहेत. ज्यामध्ये 25 धावांची त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

भारताचा अन्य फलंदाज चेतेश्वर पुजारा याची गोष्ट कोहलीपेक्षा वेगळी नाही. पुजाराला गेल्या 32 डावांत कसोटी शतक झळकावता आलेले नाही. या दरम्यान त्याने 27.64 च्या सरासरीने 857 धावा केल्या आहेत. लॉर्डस्मध्ये त्यानेदेखील दोन सामने खेळले आहेत. ज्यामधील चार डावांत त्यांला केवळ 89 धावा करण्यात यश मिळाले आणि त्याची सर्वोच्च खेळी ही 43 अशी आहे.

Back to top button