

पुढारी ऑनलाईन डेस्क :
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी ( Sunil Gavaskar ) वांद्रे ( पश्चिम ) येथील राज्य सरकारने मंजूर केलेला भूखंड परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ वर्षांपूर्वी राज्य सरकारने सुमारे २००० चौ मीटरचा भूखंड गावस्कर यांना मंजूर केला होता. या भूखंडाचा वापर केला नसल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मागील वर्षी नाराजी व्यक्त केली होती.
यासंदर्भात 'म्हाडा'च्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित भूखंडाबाबत ७ एप्रिल २०२२ रोजी गावस्कर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी या भूखंडावर क्रिकेट ॲकॅडमी स्थापन करण्यात असमर्थता दर्शवत भूखंड परत केला आहे. यापूर्वी गावस्कर यांनी सचिन तेंडुलकर याच्या सहकार्याने या भूखंडावर क्रिकेट ॲकॅडमी स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संपर्क केला होता. मात्र याला यश आले नव्हते.
१९८८ मध्ये राज्य सरकारने सुनील गावस्कर यांना क्रिकेट ॲकॅडमी स्थापन करण्यासाठी सुमारे २००० चौ मीटरचा भूखंड मंजूर केला होता. ही जागा घेण्यासाठी सुनील गावस्कर क्रिकेट फाऊंडेशनने साडेदहा लाख रुपये भरले होते. मात्र या भूखंडाचा भाडेकरार करण्यात आला नाही. कारण करारातील काही अटी गावस्कर यांना मान्य नव्हत्या. त्यांनी या अटींमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. यानंतर पुढे दोन्ही बाजूंनी कोणतीही प्रक्रिया पार पडली नाही. गेल्या ३० वर्षांमध्ये भाडेकरारही झाला नाही आणि विकासाविना भूखंड पडून राहिला होता. मागील वर्षी याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता सुनील गावस्कर यांनी या भूखंडावर क्रिकेट ॲकॅडमी स्थापन करण्याचा असमर्थता दर्शवत सरकारला हा भूखंड परत केला आहे. यासंदर्भात राज्य सरकार म्हाडाबरोबर पत्रव्यवहार करणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :