‘God Of Cricket’च्या फोटोंचा गैरवापर! Sachin Tendulkar भडकला | पुढारी

'God Of Cricket'च्या फोटोंचा गैरवापर! Sachin Tendulkar भडकला

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील प्रभावशाली खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पहिल्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ९ वर्षे उलटली तरी त्याची ब्रँड व्हॅल्यू कोणत्याही प्रकारे कमी झालेली नाही. यामुळे अनेक कंपन्यांना आजही सचिनला त्यांच्या ब्रँडशी जोडायला धडपडत असतात. पण नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये सचिनच्या फोटोचा चुकीचा वापर करण्यात आला आहे. खुद्द मास्टर ब्लास्टरने ही माहिती दिली आहे.

खरंतर, सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आज म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी एक ट्विट केले असून सचिनने एका कॅसिनोवर त्याच्या फोटोचा सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून सचिनने आपला अशा जाहिरातींशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासह त्याने अशा दिशाभूल करणा-या फोटोंना बळी पडू नका असे चाहत्यांना आवाहन केले आहे.

सचिन (Sachin Tendulkar) ट्विटमध्ये म्हणतो की, ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक जाहिराती दाखवल्या जात असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. यामध्ये मला मॉर्फ केलेल्या फोटोद्वारे कॅसिनोची जाहिरात करताना दाखवण्यात आले आहे. मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कधीच जुगार खेळलो नाही. तंबाखूजन्य पदार्थांचे किंवा दारूचे समर्थन केले नाही. लोकांची दिशाभूल करण्यासाठी माझ्या फोटोंचा वापर केला जात आहे, हे पाहून वाईट वाटले.’

सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) नेहमीच मैदानावर आणि मैदानाबाहेर वादापासून दूर राहणे आवडते. त्यामुळे त्याला क्रिकेट जगतातील जेंटलमॅन म्हटले जाते. सचिनने म्हटले की, या प्रकरणी चुकीचा प्रचार करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करणार आहे. मात्र जनहितार्थ ही बाब जारी करून अशाप्रकारच्या लोकांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

२०१३ मध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळला होता. आजही सचिन सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत २०० कसोटी सामन्यांमध्ये १५९२१ धावा केल्या आहेत. तसेच ४६३ वनडे खेळताना सचिनने १८४२६ धावा केल्या आहेत. सचिनने शेकडो जाहिरातीं केल्या आहेत.

Back to top button