GT vs SRH : गुजरातचे स्वप्नवत जय हो...

मुंबई ः वृत्तसंस्था राशिद खानने अवघ्या 11 चेंडूंत 4 गगनचुंबी षटकार खेचून गुजरातला हैदराबादविरुद्ध स्वप्नवत विजय मिळवून दिला. त्याचबरोबर आपला विजयी धडाका कायम राखलेल्या गुजरातने आता आठ सामन्यांतून सात विजयांसह आपली गुणसंख्या 14 वर नेली आहे. हैदराबादकडून उमरान मलिकने पाच गडी गारद करून सामन्यात रंग भरला होता. तथापि, त्याची ही लाजवाब कामगिरी अंतिमतः निष्फळ ठरली. मलिकने 4 षटकांत अवघ्या 25 धावा देऊन गुजरातचे 5 गडी उखडले. (GT vs SRH)
आता 8 सामन्यांतून हैदराबादने पाच विजय आणि तीन पराभवांसह दहा गुणांची कमाई केली आहे. गुजरातकडून राहुल तेवतियाने 21 चेंडूंत नाबाद 40 धावा करून मोलाचे योगदान दिले. त्याने 4 चौकार आणि 2 षटकार खेचले. राशिद खानने नाबाद 31 धावा चोपल्या.
विजयासाठी ठेवलेले 196 धावांचे लक्ष्य गुजरातने शेवटच्या चेंडूवर पार केले. गुजरातने सुरुवात जोरकस केली. सलामीवीर वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी 69 धावांची सलामी दिली. (GT vs SRH)
साहाने आक्रमक धोरण अवलंबले होते. मात्र, उमरान मलिकने गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांना बाद करून सामन्यात रंग भरला. गिलने 22 तर पंड्याने 10 धावा केल्या. पाठोपाठ मलिकने धोकादायक साहा याचा त्रिफळा उद्ध्वस्त करून गुजरातला मोठा तडाखा दिला. साहाने 38 चेंडूंचा सामना करताना 68 धावा कुटल्या. त्याने 11 चौकार व 1 षटकार फटकावला. 178.95 च्या स्ट्राईक रेटने साहाने राखला होता. आता पुन्हा एकदा मलिक हैदराबादच्या मदतीला धावून आला आणि त्याने डेव्हिड मिलरचा त्रिफळा उडवला.
गुजरात 4 बाद 139. आता अभिनव मनोहर मैदानात उतरला आणि त्याचाही त्रिफळा उमरान मलिकने उद्ध्वस्त केला. तथापि, त्यानंतर राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी हैदराबादच्या तोंडातून विजयाचा घास अलगद काढून घेतला. त्यापूर्वी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून सनरायझर्सला फलंदाजी दिली. हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 195 धावा चोपल्या. त्यांचे सहा गडी गुजरातने बाद केले. सुरुवातीलाच मोहम्मद शमीने एका अप्रतिम चेंडूवर केन विलियम्सनचा त्रिफळा उडवून गुजरातला पहिले यश मिळवून दिले. विलियम्सनने 5 धावा केल्या. (GT vs SRH)
राहुल त्रिपाठीने 16 धावांचे योगदान दिले. त्यालाही शमीने पायचीत पकडले. 10 चेंडूंचा सामना करताना त्याने 2 चौकार व एक षटकार खेचला. दहा षटके संपली तेव्हा हैदराबादने दोन गडी गमावून 84 धावा केल्या होत्या. त्यांनी आठ धावांची गती प्रतिषटक राखली होती. अभिषेक शर्माने 33 चेंडूंत 51 धावा चोपून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने या खेळीत 4 चौकार व 3 षटकार ठोकले. मात्र, अर्धशतक ठोकल्यानंतर काही वेळातच अभिषेक बाद झाला. त्याने 65 धावा केल्या त्या 6 चौकार आणि 3 षटकारांसह. अल्झारी जोसेफने त्याचा त्रिफळा उडवला. (GT vs SRH)
अभिषेकची जागा निकोलस पूरनने घेतली. दरम्यान, एडन मार्कराम याने 40 चेंडूंत 56 धावांची चमकदार खेळी केली. त्याने 2 चौकार व 3 षटकार हाणले. मार्कराम, वॉशिंग्टन सुंदर आणि निकोलस पूरन हे झटपट बाद झाले. त्यामुळे हैदराबाचे अर्धा डझन खेळाडू तंबूत परतले. शशांक सिंग (25) आणि मार्को जेन्सन (8) यांनी चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. शशांकने लॉकी फर्ग्युसनच्या शेवटच्या षटकात 4 गगनचुंबी षटकार खेचले. त्याने 416 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. गुजरातकडून मोहम्मद शमीने 3 तर यश दयाळ आणि जोसेफ अल्झारी यांनी प्रत्येकी 1 गडी टिपला. (GT vs SRH)
मार्को जेन्सनची धुलाई (GT vs SRH)
या लढतीत केन विलियम्सनचा अंदाज चुकला. त्याने भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक यांची षटके संपवली. त्यामुळे शेवटचे निर्णायक षटक टाकण्याची जबाबदारी अननुभवी मार्को जेन्सन याच्यावर सोपवावी लागली. तो दडपणाखाली आला व त्याने स्वैर मारा केला. त्याचाच फायदा राशिद खान आणि राहुल तेवतिया यांनी उठवला. जेन्सनने आपल्या चार षटकांत 63 धावा मोजल्या. त्याच्या शेवटच्या षटकातील पहिलाच चेंडू तेवतियाने सीमेवरून टोलवला आणि पुढच्याच चेंडूवर त्याने एक धाव घेतली. त्यानंतरचे तिन्ही चेंडू राशिद खानने थेट प्रेक्षकांत भिरकावले आणि गुजरातचा संघ तथा चाहत्यांनी सारे स्टेडियम डोक्यावर घेतले. (GT vs SRH)
हेही वाचलतं का?
- शाळेची फी न दिल्याने विद्यार्थीनीला तब्बल एक तास उन्हात केले उभे
- सांगली : सायकलवरून पडल्याने संभाजी भिडे यांना दुखापत
- सातारा : कोरेगावातील महामार्ग उजळणार सौरदिव्यांनी