शाळेची फी न दिल्याने विद्यार्थीनीला तब्‍बल एक तास उन्हात केले उभे | पुढारी

शाळेची फी न दिल्याने विद्यार्थीनीला तब्‍बल एक तास उन्हात केले उभे

परतूर (जि.जालणा), पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या संकटतामध्ये शाळेनी विध्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क वसुल न करण्याचे न्यायालय तथा शासनाचे निर्देश आहेत. परंतु शैक्षणिक शुल्क न दिल्याने एका विध्यार्थीनीला तब्‍बल एक तास भर उन्हात उभे केले. ही घटना परतूर शहरात घडली आहे. उन्हाच्या त्रासाने विध्यार्थीनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापनाकडून केला जात आहे.

सध्या उन्हाची तीव्रता 40 डिग्री पेक्षा जास्त असताना या उन्हात 10 मिनिटे सुद्धा उभे राहण्याची भल्या-भल्याची बिशाद होत नाही. दुपारनंतर शक्यतो उन्हात निघणे टाळण्याचा सल्ला प्रशासन देत आहे असे असताना पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विध्यार्थीनीला चक्क एक तास उन्हात उभे करण्यात आले आहे.

परतूर शहरातील एका खासगी इंग्रजी शाळेत ही ही विध्यार्थीनी शिक्षण घेत आहे. या विध्यार्थीनीच्या पालकांकडून यंदाच्या सत्रातील शैक्षणिक शुल्क भरता आले नसल्याने त्याची शिक्षा शालेय शिक्षकांनी मुलीला एक तास उन्हात उभा करून दिली आहे. ही घटना 5-6 दिवसांपूर्वी घडली आहे. एक तास उन्हात उभे राहिल्याने त्‍याचा त्रास झाला. आणि तिला रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले होते. या घटनेमुळे पालक वर्गात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सदर मुलीच्या पालकानी शाळेत जाऊन याबाबत शिक्षकांना जाब विचारला असता, सुरूवातीला त्यांनी असे काही घडलेच नसल्याचा बनाव केला.

परंतु जेव्हा मुलीने त्यांच्या समक्ष कथन केल्यावर मात्र सर्व हकीगत समोर आली. त्यामुळे शिक्षकांनी या गोष्टीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या पालकांना शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आमिष दाखविले असल्याची माहिती समोर आली आहे. आणि घटनेच्या चार दिवसांनंतरही या प्रकरणी पालकांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, हे मात्र विशेष आहे.

मोबाईलमध्ये केले रेकॉर्ड

या घटनेनंतर मुलीच्या पालकानी शाळेत शिक्षकासमोर मुलीचे म्हणणे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचे व्हिडीओ फुटेज दैनिक पुढारीला प्राप्त झाले आहे. पालकावर तक्रार न देण्यासाठी दबाव आणण्यात आला असला तरी शिक्षण विभागाने यात लक्ष घालून चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा  

Back to top button