सातारा : कोरेगावातील महामार्ग उजळणार सौरदिव्यांनी | पुढारी

सातारा : कोरेगावातील महामार्ग उजळणार सौरदिव्यांनी

कोरेगाव : पुढारी वृत्त सेवा

कोरेगावचा कायापालट करण्यासाठी आ. महेश शिंदे यांना नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी साथ दिली आहे. कोरेगाव शहरासाठी नगर विकास मंत्रालय सातत्याने वेगवेगळ्या योजनांमधून निधीची तरतूद करत आहे. आता सहाय्य योजनेंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून शहरात महामार्गांवर सौर दिवे बसवले जाणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष सौ. दिपाली बर्गे व उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे यांनी दिली.

कोरेगाव नगरपंचायतीने सादर केलेल्या विविध विकासकामांच्या प्रस्तावांना ना. एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यासाठी गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई व आ. महेश शिंदे यांनी परिश्रम घेतले. माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, जिल्हा बँक संचालक सुनील खत्री यांनी हे प्रस्ताव सादर केले आहेत.

कोरेगाव शहरातील वसना नदी पूल ते कुमठे फाटा व जुना मोटर स्टँड ते औद्योगिक वसाहत या दरम्यान 250 सौर ऊर्जा पथदिवे बसवले जाणार आहेत. त्यासाठी 1 कोटी 60 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. याचबरोबर शहरात इनडोअर स्टेडीयम, जिम व स्विमिंग पूल बांधण्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कालेकर कॉलनी अंतर्गत ट्रिमिक्स काँक्रिटीकरण रस्ता आणि बंदिस्त गटार या कामासाठी 25 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक 7 मध्ये ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर ते लालासाहेब शिंदे यांचे घर ते प्रदीप बोतालजी यांच्या वखारीपर्यंत बंदिस्त गटर व रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरण करण्यासाठी 40 लाख रुपये तर याच प्रभागातील कापसे यांचे घर ते सुनील आडके यांच्या घरापर्यंत ट्रिमिक्स काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार करण्यासाठी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

बचतीसह वीज बिलात काटकसर

शहरातील पथदिव्यांमुळे नगरपंचायतीला भरमसाठ वीजबिले भरावी लागत होती. शहराचा वाढता विस्तार आणि पथदिव्यांची मागणी लक्षात घेता नगरपंचायतीच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होत होता. ही बाब लक्षात घेऊन आ. महेश शिंदे यांनी नगरपंचायत निवडणुकीपूर्वी शहरात सौर ऊर्जा दिवे बसवण्याचा शब्द दिला होता. तो शब्द खरा ठरवत सौर ऊर्जेचा वापर करून रस्त्यांवर विजेचा लखलखाट होणार आहे. कोरेगाव शहरातून जाणारे महामार्ग सुशोभित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यापैकीच सौर ऊर्जा पथदिवे एक आहे, अशी माहिती माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी दिली.

Back to top button