सातारा : तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाणवठ्यांचा गारवा पक्षीप्रेमींचा पुढाकार : ग्रामीण भागांतही छोटे-मोठे पाणवठे | पुढारी

सातारा : तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाणवठ्यांचा गारवा पक्षीप्रेमींचा पुढाकार : ग्रामीण भागांतही छोटे-मोठे पाणवठे

पुसेसावळी (सातारा), विलास आपटे :  उन्हाच्या कडाक्यामुळे आपल्या घशाला कोरड पडत आहे. तर, मग पक्ष्यांचे काय होत असेल? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. यावर उपाय म्हणून तहानलेल्या पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी आता पक्षीप्रेमी जागृत झाले आहेत. गजबजलेल्या सिमेंटच्या जंगलात, दाराबाहेर, खिडकीत किंवा अंगणात पक्ष्यांसाठी छोटे-मोठे कृत्रिम पाणवठे तयार होत असल्याचे चित्र ग्रामीण भागांतही पाहायला मिळत आहे.

आपल्या अंगणात पक्ष्यांसाठी छोट्याशा पसरट भांड्यात पाणी ठेवायला अनेकांनी सुरुवात केल्याने तिथं पक्षी जमा होवू लागले आहेत.काहीजण घरातील स्टील किंवा प्लास्टिकच्या भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवत आहेत. त्यासाठी कोणी बाजारातून खास मातीची किंवा प्लास्टिकची भांडी विकत आणत आहेत. पक्षीप्रेमी घरच्या घरी वॉटर फिडर बनवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरू लागले आहेत.

प्लास्टिकच्या बाटल्या, बरण्या, तार, दोरी, मातीचे भांडे, अशा सामग्रीचा वापर करुन घरच्या घरी वॉटर फिडर बनविता येतो.
फार पूर्वीपासून कडक उन्हाळ्यात जाणा-येणार्‍यांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून निःशुल्क व्यवस्था केली जायची ती म्हणजे पाणपोई होय. या प्रकारची व्यवस्था पूर्वी देवळात, धर्मशाळेत करण्यात येत होती. मातीचे रांजण वा मोठे माठ आदल्या दिवशी रात्रीपासून विहिरीच्या पाण्याने भरुन ठेवले जात असत. दुसर्‍या दिवशी सकाळपासून त्यातून थंड पाणी मिळत होते. आता आधुनिक काळात जल-शीतक (वॉटर कुलर) वापरले जात आहेत. झाडाची वा इमारतीची गर्द सावली बघून तसेच रस्त्याच्या कडेला पाणपोई लावल्या जातात. तहानलेले लोक तेथे पाणी पितात. मानवांसाठीच्या पाणपोईसारखीच प्राण्यांसाठीही दगडाचे वा सिमेंटचे आयताकृती टाकी बांधून व त्यात पाणी सोडून पाणपोई करण्यात येत आहे. कोणतीही व्यक्ती मातीचा माठ अर्धा कापून किंवा मोठ्या झाडास भांडी टांगून उन्हाळ्यात पक्ष्यांसाठीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू शकतो.

जंगलातील पाणवठे उन्हाळ्यात कोरडे पडतात. जंगलातील वन्य प्राणी पाणीटंचाईमुळे पाण्याच्या शोधार्थ गावाकडे येत आहेत. त्यामुळे काही संस्था व व्यक्ती मिळून जंगलात कृत्रिम टाकी जमिनीत खोदून पाणी जमिनीत जिरू नये म्हणून त्यात पॉलीथिन पेपर टाकून त्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येते. कुळकजाई, ता. माण येथील अजय घोरपडे व त्यांच्या मित्रांनी दुष्काळी गावात डोंगरावर सिमेंटपासून लहान-लहान 5 पाणवठे तयार केले आहेत. पक्ष्यांसाठी धान्याचीही तरतूद केली आहे. दर 4 दिवसांनी या पाणवठ्यात पाणी भरले जाते. सर्वांनी मिळून पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करणे गरजेचे आहे.

  • जिल्ह्याच्या पश्चिमेकडील जंगलात असे
  • पाणवठे बांधणे गरजेचे
  • विशेषत: दुष्काळी भागात तसेच डोंगर असलेल्या गावांतून अशी पाणवठ्यांची व्यवस्था हवी
  • आपण बनवलेल्या पाणवठ्यात पक्षी पाणी पिताना पाहून होणारा आनंद विरळाच..!

Back to top button