टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकियो ऑलिम्पिक नेमबाजीमध्ये महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स स्पर्धेत भारताच्या अंजूम मौदगिल आणि तेजस्विनी सावंत अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकल्या नाहीत. अंजूम मौदगिल १५ व्या स्थानी तर तेजस्विनी सावंत हिला ३३ वे स्थान मिळाले.
अंतिम ८ मध्ये स्थान मिळवण्यासाठीची पात्रता फेरी आज शनिवारी पार पडली. या फेरीत अंजूमने ११६७ स्कोर केला. तर तेजस्विनीने ११५४ स्कोर केला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे तब्बल १५ नेमबाज सहभागी झाले आहेत. यात मनू भाकर, सौरभ चौधरी आणि राही सरनोबत, तेजस्विनी सावंत यांसारख्या नेमबाजांचा समावेश आहे.
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिला हॉकी संघाने ४-३ असा विजय नोंदवला. आज सायंकाळी आयर्लंड विरुद्ध ब्रिटन यांच्यामध्ये सामना होणार आहे. यामध्ये आयर्लंडचा पराभव झाल्यास भारतीय हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरी गाठेल.
तर भारताच्या कमलप्रीत कौर हिने भारताला पदक मिळवून देण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या आहे. कमलप्रीत कौर हिने ६४ मीटरवर थाळीफेक करून अंतिम स्पर्धेत स्थान मिळविले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या पुरूष एकेरीत भारताचा तिरंदाज अतानू दास याला पराभवाचा धक्का बसला.
अंतिम आठसाठीच्या फेरीत अतानू दास याला जपानच्या ताकाहारू फुरुकावाने ६-४ अशा सेटमध्ये हरवले. यामुळे तिरंदाजीमधील पदकाच्या आशा मावळल्या आहेत.
बॉक्सिंगच्या ४८-५२ किलो वजनी गटात सोळासाठीच्या राऊंडमध्ये भारताचा बॉक्सर अमित पांघलचा पराभव झाला. त्याला कोलंबियाच्या युर्बेजेन मार्टिनेझने ४-१ असे हरवले.
भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने सेमीफायनलमध्ये धडक मारली. यामुळे ती ऑलिम्पिक पदकाच्या आणखी जवळ पोहोचली आहे.
यामुळे सर्वांच्या नजरा पी.व्ही. सिंधूच्या उपांत्य फेरीतील सामन्याकडे लागल्या आहेत.
हे ही वाचा :