घनसाळ, जिरगा तांदळाच्या देशी वाणाचे सुधारीकरण | पुढारी

घनसाळ, जिरगा तांदळाच्या देशी वाणाचे सुधारीकरण

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील देशी वाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आजरा घनसाळ आणि काळा जिरगा या तांदळाच्या वाणांचे सुधारीकरण करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने याचे संशोधन केले. या वाणांचा वास, चव आणि पोषणमूल्ये कायम ठेवून त्याचे उत्पादन वाढवण्यात आले आहे. या वाणांचा परिपक्‍व होण्याच्या कालावधीही कमी केला आहे. यामुळे शेतकर्‍यांना या वाणांचे पीक कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे ठरेल, असा विश्‍वास कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. एन. बी. गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला.

मुंबई येथील डीएई-बीआरएनएस आणि नवी दिल्‍ली येथील डीएसटी-एसईआरबी यांच्या भातांच्या वाणांचे सुधारीकरण प्रकल्पांतर्गत डॉ. गायकवाड, संशोधक विद्यार्थी शीतलकुमार देसाई व अकेश जाधव यांनी संशोधन केले. याकरिता 72 लाख रुपयांचा निधी मिळाला होता. डॉ. गायकवाड म्हणाले, आजरा घनसाळ आणि काळा जिरगा या वाणांमध्ये खनिजे आणि इतर पोषकतत्त्वे मोठ्या प्रमाणात आहेत. काही मर्यादांमुळे त्यांची लागवड कमी भागांमध्ये केली जाते. या बाबी लक्षात घेऊन वाणांच्या अनुवांशिक गुणांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा, तसेच त्यांचे उत्पादन वाढवण्याचा संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आला. विविध प्रकारच्या म्युटेजेनिक एजंटचा वापर करून या पिकांच्या सहा पिढ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामधून अधिक उत्पादन देणारे, लवकर परिपक्‍व होणारे, कमी उंचीचे आणि आडवे न पडणारे असे गुणधर्म असणारे वाण विकसित केले. कर्जत येथील केंद्रातून 17 ठिकाणी हे वाण कोडिंग करून पाठवले जाईल. बहुस्थानिक चाचण्यांकरिता सदरच्या नवीन सुधारित वाणांची बियाणे आता तयार करण्यात आली आहेत. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सक्षम प्राधिकरणांच्या मान्यतेनंतर या सुधारित भातांच्या जाती लागवडीसाठी वितरित करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

48 देशी वाणांचे संकलन व संवर्धन

जिल्ह्यातून 9 सुवासिक आणि 39 असुवासिक अशा एकूण 48 भातांच्या देशी वाणांच्या प्रजाती संकलित केल्या आहेत. 2020 आणि 2021 या सलग दोन वर्षांच्या खरीप हंगामात त्यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील शेतकरी, महिला आणि पुरुषांच्या बचत गटांना या संकलित केलेल्या देशी वाणांचे संवर्धन करण्यासाठी वितरण केले आहे.

देशी वाणांचे जतन व संवर्धन करण्याच्या चळवळीची परंपरा शिवाजी विद्यापीठाने कायम ठेवली आहे. अशा प्रकारे संशोधन करणारे हे पहिले अकृषी विद्यापीठ आहे. हे संशोधन क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. सहा वर्षांहून अधिक काळ अथक संशोधन करून सदर वाणांचे रंग, वास, चव आणि पोषणमूल्येअसे मूळ गुणधर्म अबाधित राखून सुधारित वाण तयार करण्याची त्यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे कुलगुरू डॉ.शिर्के यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, वनस्पतीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. वर्षा जाधव, डॉ. व्ही. ए. बापट, डॉ. जी. बी. दीक्षित, डॉ. एस. आर. यादव, डॉ. एम. एस. निंबाळकर, डॉ. एम. एम. लेखक उपस्थित होते.

Back to top button