भाजपच्या विजयाचा जनतेकडून चौकार : नरेंद्र मोदी | पुढारी

भाजपच्या विजयाचा जनतेकडून चौकार : नरेंद्र मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील पाच राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडली. यात पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपचा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चारही राज्यांमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजप कार्यकर्ते आणि जनतेला संबोधन केले.

पीएम मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, आजचा दिवस उत्साहाचा, उत्सवाचा आहे. हा सण भारतीय लोकशाहीचा आहे. या निवडणुकीत भाग घेतलेल्या सर्व मतदारांचे मी अभिनंदन करतो. मतदारांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. चार राज्यात भाजपला मोठे यश मिळाले. यासाठी मी त्या-त्या राज्यातील जनतेचे आभार मानतो. आज उत्साहाचा आणि उत्सवाचा दिवस आहे. भाजप कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत केली. या वर्षी १० मार्चपासून होळी सुरू होईल, असे आश्वासन भाजप कार्यकर्त्यांनी दिले होते आणि त्यांनी ते वचन पाळले आहे. कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम केले आणि राज्यभरातील लोकांचा विश्वास जिंकण्यात यश मिळवले.

यूपीने देशाला अनेक पंतप्रधान दिले आहेत, मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच घटना आहे. यूपीमध्ये सलग दुसऱ्यांदा एखादे सरकार सत्तेत येण्याची ही ३७ वर्षांनंतरची घटना आहे. सत्ताधारी होऊनही मणिपूर, उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपच्या मतसंख्येत वाढ झाली आहे. गोव्यातील सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध झाले असून, गोव्यातील जनतेने आम्हाला सलग तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली आहे, असेही त्यांनी व्यक्त केले. (PM Narendra Modi)

सीमेला लागून असलेले डोंगराळ राज्य, समुद्रकिनारी असलेले राज्य, माँ गंगेचा विशेष आशीर्वाद असलेले राज्य आणि ईशान्य सीमेवरील राज्य, भाजपला चारही दिशांनी जनतेचे आशीर्वाद मिळाले आहेत. या राज्यांपुढील आव्हाने वेगळी आहेत, प्रत्येकाचा विकासाचा मार्ग वेगळा आहे, पण सर्वांना एका धाग्यात बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे भाजपवरचा विश्वास, भाजपचे धोरण, भाजपचा हेतू आणि भाजपच्या निर्णयांवरील अपार विश्वास. अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली.

Back to top button