पुढारी ऑनलाईन डेस्क
कोरोनामुळे वर्षभरा लांबणीवर गेलेला महिला विश्वचषक स्पर्धेला आज सुरूवात झाली आहे. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या १२व्या विश्वचषक स्पर्धेतला पहिला सामना सध्या सुरू आहे. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात येत आहे. तर भारताचा विश्वचषकातील पहिला सामना ६ मार्चला पाकिस्तानशी होणार आहे. (Womens World Cup)
न्यूझीलंडच्या मायभूमीत खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात ८ संघ सहभागी झाले आहेत. यजमान देश असल्याने किवी संघ आधीच पात्र ठरला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत २०१७ ते २०२१ या कालावधीत झालेल्या महिला चॅम्पियनशिपमध्ये टॉप ५ मध्ये पात्र ठरले. उर्वरित 3 संघ पात्रता फेरीच्या आधारे ठरवले गेले. (Womens World Cup)
मागच्या वर्षी झिम्बाब्वेमध्ये येथे नोव्हेंबर – डिसेंबर या कालावधीत खेळले जाणारे विश्वचषक पात्रता फेरीतील सामने कोविड-१९ मुळे रद्द करण्यात आले होते. यानंतर उर्वरित ३ संघ एकदिवसीय क्रमवारीच्या आधारे निश्चित करण्यात आले. या आधारावर पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगला देश या संघाना प्रवेश मिळाला. तर दुसरीकडे, श्रीलंका, थायलंड आणि आयर्लंड या देशांच्या महिला संघांना विश्वचषक स्पर्धेत भाग घेता आला नाही. बांगला देशचा महिला संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत आहे. संघ प्रथमच विश्वचषकात सहभागी होत आहे. (Womens World Cup)
भारतीय महिला संघाचा विश्वचषकातील प्रवास ६ मार्च पासून सुरू होणार आहे. ६ मार्चला भारताचा विश्वचषकातील पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानशी होणार आहे. त्तपूर्वी, एक दिवस आधी म्हणजे ५ मार्चला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये सामना होणार आहे. १३ मार्चला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये सामना होणार आहे. यादरम्यान २८ मार्चला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम राऊंड रॉबिन सामना खेळवला जाणार आहे.
आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चे उपांत्य फेरीतील सामने ३० आणि ३१ मार्चला खेळवण्यात येणार आहेत. तर अंतिम सामना ३ एप्रिलला होणार आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार ३ एप्रिलला होणारा अंतिम सामन्यात व्यत्यय आल्यास अंतिम सामन्यात खेळणाऱ्या दोन्ही संघांना संयुक्तपणे विजयी घोषित करण्यात येणार आहे.
२०१९ ला इंग्लंडमध्ये झालेल्या पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषकाप्रमाणेच या स्पर्धेत यावेळी प्रत्येक संघ महिला विश्वचषकात एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. यामधील जास्त सामने जिंकलेले ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीत, प्रथम क्रमांकाचा संघ चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल, तर दुसरा संघ तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल.
सामन्यातील विजेत्या संघाला प्रत्येकी 2 गुण दिले जाणार आहे. सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण दिला जाणार आहे. राऊंड रॉबिन स्टेज दरम्यान बरोबरीत असलेला सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात येणार नाही. जर राऊंड रॉबिन सामन्यांमध्ये 2 संघांचे समान गुण असतील, तर ज्या संघाचे नेट रनरेट जास्त असलेला संघ पात्र ठरेल. दोन्ही संघांचा निव्वळ रनरेट बरोबरीत राहिल्यास हेड टू हेड सामन्यांच्या आधारे संघ पात्र ठरेल. उपांत्य आणि अंतिम सामना बरोबरीत सुटला तरच सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे.
महिला क्रिकेट विश्वचषकाचे सामने ६ ठिकाणी खेळवले जातील. ऑकलंड, क्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, माउंट मोनमानुगाई आणि वेलिंग्टन या शहरांमध्ये विश्वचषकातील सामने खेळवले जाणार आहेत. विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने वेलिंग्टन आणि क्राइस्टचर्च येथे खेळवले जाणार आहेत. तर वेलिंग्टन शहरात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यजमानपदही भूषवणार आहे.