कोल्हापूर : ‘आयजी’ ऑफिस पुण्याला हलविण्याचा बड्या मंत्र्यांचा घाट | पुढारी

कोल्हापूर : ‘आयजी’ ऑफिस पुण्याला हलविण्याचा बड्या मंत्र्यांचा घाट

कोल्हापूर : दिलीप भिसे : कोल्हापूर खंडपीठ आणि पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेसाठी कोल्हापूरकरांचा 38 वर्षांपासून प्रदीर्घ लढा सुरू आहे. या काळात सरकारकडून केवळ तोंडाला पाने पुसण्याशिवाय काही साध्य झाले नाही. आता तर कोल्हापुरातील विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) कार्यालय पुण्याला हलविण्याचा घाट घालण्यात येत आहे. पुण्यातील एका बड्या मंत्र्याच्या मर्जीखातर प्रशासकीयस्तरावर हा खटाटोप सुरू झाला आहे.

लोकभावनांची कदर न करता सत्ता व अधिकारपदाच्या जोरावर कोल्हापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने करवीरवासीयांत संतापाची लाट उसळली आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटनांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कोल्हापूर, सांगलीसह सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कोल्हापूर परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) कार्यालय पुण्याला हलविण्यासाठी पडद्याआड हालचाली सुरू होत्या. मात्र, खुद्द गृह मंत्रालयाकडूनच याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून अभिप्राय मागविण्यात आल्याने आयजी कार्यालय स्थलांतराचा विषय कळीचा मुद्दा बनण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूरकरांना संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावे, यासाठी कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांचा चार दशकांचा लढा सुरू आहे. शांततेच्या मार्गाने शेकडो आंदोलने झाली. 17 हजारांवर वकिलांसह न्यायापासून वंचित असलेल्या हजारो पक्षकारांनी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचे आंदोलन पुकारले. मात्र, याबाबत कोणालाही पाझर फुटला नाही. आजअखेर खंडपीठाचा प्रस्ताव कागदावरच रेंगाळतो आहे.

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या आणि गुन्ह्यांचा वाढता आलेख याचा सारासार विचार केल्यास पोलिस दलाच्या उपलब्ध मनुष्यबळावर मर्यादा येत आहेत. शहरी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी स्वतंत्र विभाग असावा, या हेतूने कोल्हापूर पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव कागदावर आला.
पिंपरी-चिंचवाड, अकोल्याला न्याय : कोल्हापूरचा प्रस्ताव मात्र दप्तरात!

पोलिस आयुक्तालयासाठी 35 वर्षांपासून कागदोपत्री मेळ घातला जातो आहे.आजवर एकापाठोपाठ पन्नासवर सुधारित प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे सादर करण्यात आले आहेत. कोल्हापूर आयुक्तालयावर शिक्कामोर्तब होणार, असे चित्र असतानाच पिंपरी-चिंचवड आणि अकोल्यासाठी मंजुरी देण्यात आली. कोल्हापूर आयुक्तालयाचा प्रस्ताव पुन्हा दप्तरात गुंडाळून ठेवण्यात आला. ही वस्तुस्थिती आहे.

कोल्हापूर परिक्षेत्र : 1965  पासून 2020 पर्यंतचा प्रवास 1965 मध्ये शनिवार पेठेत पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालय सुरू झाले. 17 ऑक्टोबर 1988 रोजी तत्कालीन पोलिस महानिरीक्षक सत्येंद्र प्रसन्न सिंह यांच्या उपस्थितीत आयजी कार्यालयाच्या बांधकामाचा प्रारंभ झाला, तर 14 मे 1990 रोजी पोलिस महासंचालक वसंतराव सराफ यांच्या हस्ते नवीन वास्तूचे उद्घाटन झाले. या काळात डी. पी. पी. थोरात, एम. ए. कांबळे, एम. जी. नरवणे, यू. डी राजवाडे, धनंजय जाधव, ओ. पी. बाली, आर. बी. पवार, भगवंतराव मोरे, तुकाराम चव्हाण, रितेशकुमार, सुहास वारके यांच्यासह 31 भारतीय पोलिस सेवेतील अधिकार्‍यांनी कामगिरी बजावली आहे.

आयजी ऑफिस पुण्याला हलविण्याचा हेतू काय?

भविष्यात कोल्हापूरला खंडपीठ स्थापनेवर शिक्कामोर्तब झाल्यास शासनाच्या विविध खात्यांची 52 पेक्षा अधिक विभागीय कार्यालये कोल्हापुरात नव्याने सुरू करावी लागणार आहेत. त्यात विशेष पोलिस महानिरीक्षक ( आयजी) ऑफिसचाही समावेश असेल, ही वस्तुस्थिती असताना घाईगडबडीत आयजी ऑफिस पुण्याला हलविण्याचा हेतू काय? लोकभावनांची कदर न करता सत्ता आणि अधिकारपदाच्या जोरावर कोल्हापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याने संतप्त पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोल्हापुरातील आयजी ऑफिस पुण्याला हलविण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील काही बडे मंत्री आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सोयीसाठी हे कारस्थान सुरू आहे. आयजी ऑफिस हलविण्याचा प्रयत्न झाल्यास कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील निवृत्त अधिकारी, पोलिस रस्त्यावर उतरतील. लोकांच्या संतप्त भावना सरकारला परवडणार नाहीत.
– पी. जी. मांढरे, अध्यक्ष,
निवृत्त पोलिस कल्याणकारी संघटना

Back to top button