Joe Root : जो रूटची आर. अश्विनला मात, ठरला ‘ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर’! | पुढारी

Joe Root : जो रूटची आर. अश्विनला मात, ठरला ‘ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूच्या नावाची घोषणा केली आहे. सोमवारी आयसीसीने सोशल मीडियाच्या माध्यमातून हे नाव उघड केले. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने (Joe Root) या शर्यतीत सहभागी दिग्गजांना मागे टाकत हे विशेष जेतेपद पटकावले. गेल्या वर्षी रुटने कसोटीत दोन द्विशतकांसह ६ शतके झळकावली आहेत.

आयसीसीने २०२१ सालातील सर्वोत्तम पुरुष कसोटीपटूचे नाव जाहीर केले आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने (Joe Root) या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या विजेतेपदाच्या शर्यतीत भारताचा फिरकीपटू आर अश्विन, याशिवाय न्यूझीलंडचा काईल जेमिसन आणि श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने यांच्या नावाचा अंतिम चार खेळाडूंमध्ये समावेश झाला होता.

रूटने (Joe Root) गेल्या मोसमात धमाकेदार फलंदाजी करताना १५ सामन्यांत १७०८ धावा केल्या होत्या. या यादीत त्याच्या जवळपास दुसरा कोणताही फलंदाज दिसला नाही. २०२१ मध्ये १००० कसोटी धावा करणारा रूट हा एकमेव फलंदाज राहिला. रोहित शर्मा ९०६ धावांसह दुसऱ्या स्थानावर असला तरी त्याचे नाव शेवटच्या चारमध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते. रूटने वेस्ट इंडिजविरुद्ध गालेमध्ये २२८ धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने चेन्नईत भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात द्विशतकही ठोकले होते.

इंग्लंडच्या संघाला यंदा २०२२ वर्षाची चांगली सुरुवात करता आली नाही. अॅशेस मालिकेत त्याला इंग्लंडविरुद्ध ०-४ असा पराभव पत्करावा लागला. यानंतर रुटला (Joe Root) कर्णधारपदावरून हटवण्याचीही चर्चा झाली. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने आयपीएल २०२२ मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी, यावेळी भारताच्या एकाही खेळाडूला वनडे आणि टी-२० संघात स्थान मिळवता आले नाही.

Back to top button