India vs South Africa 3rd ODI : भारताच्या पराभवानंतर दीपक चहर इमोशनल, चाहते म्हणाले- तुझ्या अर्धशतकी खेळीला सॅल्यूट! | पुढारी

India vs South Africa 3rd ODI : भारताच्या पराभवानंतर दीपक चहर इमोशनल, चाहते म्हणाले- तुझ्या अर्धशतकी खेळीला सॅल्यूट!

केपटाऊन : वृत्तसंस्था

29 वर्षांनंतर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न घेऊन दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या भारतीय संघाला कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकेतही दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. रविवारी झालेल्या तिसर्‍या सामन्यात (India vs South Africa 3rd ODI) दक्षिण आफ्रिकेने 4 धावांनी विजय मिळवून भारताला 3-0 ने व्हाईट वॉश दिला. क्विंटन डिकॉक आणि वॅन डॅर ड्युसेन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर द. आफ्रिकेने भारतासमोर निर्धारित 50 षटकांत 288 धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना शिखर धवन (61), विराट कोहली (65) आणि दीपक चहर (54) यांच्या संघर्षपूर्ण खेळीनंतरही भारत 4 धावांनी मागे राहिला. क्विंटन डिकॉक याला सामनावीरचा व मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला.

टीम इंडियाच्या पराभवानंतर दीपक चहर याला निराशा लपवता आली नाही. निराश होऊन खुर्चीत बसलेल्या दीपक चहर याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचा हा फोटो पाहून एका चाहत्याने, केवळ ४ धावांनी भारत हारला, पण दीपक चहरला सॅल्यूट, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार के.एल. राहुल 9 धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि शिखर धवन या दोघांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी मिळून 98 धावांची भागीदारी केली. शिखर धवन अर्धशतक (61) झळकावून बाद झाला. ऋषभ पंत पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. नंतर विराटने डावाला गती दिली; पण तोदेखील अर्धशतकी खेळी (65) करून माघारी परतला. सूर्यकुमार यादव (39) आणि श्रेयस अय्यर (26) यांच्याकडे छाप पाडण्याची संधी होती, पण ते दोघे बेजबाबदार फटके खेळून माघारी परतले.

यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची फक्त औपचारिकातच उरली आहे, असे वाटत असताना दीपक चहरने बुमराहला हाताशी घेऊन झुंज दिली. दोघांनी अशक्यप्राय वाटणारा विजय द़ृष्टिपथात आणला; परंतु एन्गिडीने आपला अनुभव पणाला लावत चहरला प्रिटोरियसकरवी झेलबाद केले. त्याने 54 धावांची खेळी केली. यावेळी विजयाला फक्त दहा धावांची आवश्यकता होती; पण पुढच्या पाच धावांत द. आफ्रिकने बुमराह आणि चहल यांना बाद करून 3-0 अशा मालिका विजयाची नोंद केली. तत्पूर्वी, भारतीय कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

गोलंदाज दीपक चहर याने तिसर्‍याच षटकात जे मलान याला बाद केले. यानंतर क्विंटन डिकॉक याने टेम्बा बवुमा याच्या साथीने सावध सुरुवात करत स्कोअरबोर्ड हालता ठेवला. पण सहाव्या षटकात टेम्बा बवुमा धावबाद झाला. यावेळी द. आफ्रिकेची अवस्था 34 धावांत 2 बाद अशी होती. मार्करम याच्या साथीने डिकॉकने आपली खेळी पुढे सुरू ठेवली. दीपक चहर याने 13 व्या षटकात जम बसवू पाहणार्‍या मार्करमला झेलबाद केले. मार्करम याने 15 धावांची खेळी केली. यानंतर डिकॉकची साथ देण्यासाठी ड्युसेन मैदानात उतरला. 18 व्या षटकात डिकॉक याने आपले अर्धशतक पूर्ण केले. 31 व्या षटकात क्विंटन डिकॉक याने आपले 17 वे एकदिवसीय शतक झळकावले. डिकॉकच्या पाठोपाठ ड्युसेन याने आपले अर्धशतक झळकावले. (India vs South Africa 3rd ODI)

अखेर 144 धावांची भागीदारी रचून डोकेदुखी ठरलेल्या डिकॉकला 36 व्या षटकात बुमराहने बाद केले. त्याने 130 चेंडूंत 124 धावांची खेळी केली. यात त्याने 12 चौकारांसह 2 षटकार मारले. डिकॉकच्या पाठोपाठ चहलने ड्युसेनला बाद केले. ड्युसेन याने 59 चेंडूंत 52 धावांची खेळी केली. दोन्ही जम बसलेल्या फलंदाजांना पाठोपाठ बाद करत भारताने सामन्यात पुनरागमन केले. यानंतर आंदिले फेहलुक्वायो हा 4 धावांवर धावचित झाला. यानंतर डेव्हिड मिलर याने खेळाची सूत्रे आपल्या हाती घेतली; परंतु त्याला अखेरच्या फलंदाजांनी फारशी साथ दिली नाही.

48 व्या षटकात प्रिटोरियस 20 धावा करून बाद झाला. प्रसिद्ध कृष्णा याने त्याला बाद केले. पुढील 49 व्या षटकात केशव महाराज 6 धावांवर बाद झाला. त्याला बुमराहने बाद केले. 50 व्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर मिलर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. मिलरने 38 चेंडू 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. एक चेंडू बाकी असताना प्रसिद्ध कृष्णा याने मगाला याला बाद करत आफ्रिकेचा खेळ संपवला. आफ्रिकेने भारतासमोर 288 धावांचे आव्हान ठेवले.

Back to top button