Jason Roy चा धमाका, २४५ स्ट्राइक रेटने ३६ चेंडूत शतक! | पुढारी

Jason Roy चा धमाका, २४५ स्ट्राइक रेटने ३६ चेंडूत शतक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल (IPL) मेगा लिलावापूर्वी इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयने (Jason Roy) मैदानात जोरदार पुनरागमन करून स्फोटक खेळी साकारली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी २० (T20I) मालिकेपूर्वी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात रॉयने अवघ्या ३६ चेंडूत शतक झळकावले. किंग्स्टन ओव्हल येथे झालेल्या सामन्यात त्याने बार्बाडोस क्रिकेट असोसिएशन प्रेसिडेंट-इलेव्हन विरुद्ध ४७ चेंडूत ११५ धावांची तुफानी खेळी केली.

शतकादरम्यान, जेसन रॉयचा (Jason Roy) स्ट्राइक रेट २४४.६८ होता आणि त्याने मैदानाभर जोरदार फटके मारताना ९ चौकार आणि १० षटकार ठोकले. जेसनने पहिल्या विकेटसाठी टॉम बँटन (३२) सोबत १४१ धावांची भागीदारी केली. रॉयच्या शतकामुळे इंग्लंडने २० षटकांत चार विकेट गमावून २३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात बार्बाडोस-इलेव्हनला केवळ १३७ धावा करता आल्या आणि त्यांनी सामना ९४ धावांनी गमावला.

मेगा लिलावाकडे नजरा..

जेसन रॉयच्या (Jason Roy) या खेळीनंतर आयपीएल मेगा लिलावात सर्व संघांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या असतील यात शंका नाही. गेल्या वर्षी आयपीएल २०२१ मध्ये, सनरायझर्स हैदराबादने जेसन रॉयला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजे २ कोटींना खरेदी केले होते. त्याने ५ डावात ३० च्या सरासरीने १५० धावा केल्या, पण यावेळी हैदराबाद संघाने त्याला सोडचिठ्ठी दिली आहे.

रॉयने (Jason Roy) आतापर्यंत १३ आयपीएल सामने खेळले आहेत आणि १२९.०२ च्या स्ट्राइक रेटने ३२९ धावा केल्या आहेत. १३ डावांमध्ये त्याने केवळ २ अर्धशतकी खेळी साकारली आहेत. हैदराबादशिवाय तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात लायन्सकडूनही खेळला आहे.

२२ जानेवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला सामना…

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारीला होणार आहे. २२ ते ३० जानेवारी दरम्यान टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अॅशेस मालिकेत ४-० असा पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंडसाठी हा कॅरेबियन दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

Back to top button