Test Ranking : टीम इंडियाला मागे टाकत ऑस्ट्रेलियाची पहिल्यास्थानी झेप! - पुढारी

Test Ranking : टीम इंडियाला मागे टाकत ऑस्ट्रेलियाची पहिल्यास्थानी झेप!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी कसोटी संघ क्रमवारी (Test Ranking) जाहीर केली. जिथे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला मागे टाकत पहिल्यास्थानी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धची अॅशेस मालिका 4-0 अशी जिंकण्याचा फायदा कांगारू संघाला मिळाला. तर दुररीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 ने झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाला फटका बसला. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे.

ऑस्ट्रेलियन संघाने मे 2020 नंतर प्रथमच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकवले आहे. कांगारू संघ (119 गुण) पहिल्या, न्यूझीलंड (117 गुण) दुसऱ्या आणि भारतीय संघ (116 गुण) तिसऱ्या क्रमांकावर आहे. ॲशेस मालिका गमावल्यानंतरही इंग्लंड कसोटी क्रमवारीत (101 गुण) चौथ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर आफ्रिकेचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. (Test Ranking)

आफ्रिकेविरुद्ध 2-1 अशा पराभवामुळे टीम इंडियाने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गमावले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत पहिले स्थान काबीज केले होते. जर भारताने द. आफ्रिकेविरुद्धची मालिकाही जिंकली असती तर कदाचित टीम इंडियाने पहिले स्थान गमवले नसते. (Test Ranking)

टीम इंडियाने सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला होता. यानंतर आफ्रिकन संघाने दुसरी कसोटी जिंकून दमदार पुनरागमन तर केलेच, पण तिसरा सामना जिंकून मालिकाही खिशात टाकली. आफ्रिकेने जोहान्सबर्ग आणि केपटाऊन कसोटी ७ गडी राखून जिंकल्या. (Test Ranking)

ऑस्ट्रेलियासाठी दुहेरी आनंद

कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर येण्याबरोबरच, कांगारू संघ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंका पहिल्या तर पाकिस्तान नाव तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

Back to top button