केपटाउन; पुढारी वृत्तसेवा : केपटाऊन मधील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात ऋषभ पंतने दमदार शतक झळकावले. त्याच्या आश्वासक खेळीने भारताने सामन्यात २००हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. ऋषभ पंत याने १३३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. भारताने दुसर्या डावात आत्तापर्यंत ९ विकेट गमावल्या आहेत.
ऋषभ पंतने आपल्या नैसर्गिक खेळाच्या शैलीत फलंदाजी करत शतकाला गवसणी घातली. या खेळीत त्याने चार षटकार आणि सहा चौकारांची आतषबाजी केली. संघाची स्थिती नाजूक असताना तो मैदानावर फलंदाजीसाठी उतरला होता. या स्थितीमध्ये कर्णधार विराट कोहली सोबत संथ गतीने तो फलंदाजी करत होता. विराट कोहली बाद झाल्यावर त्याने आक्रमक खेळ करत आपले शतक पूर्ण केले. तळातील फलंदाजांना सोबत घेत तो शतका जवळ पोहचला. सध्या ऋषभ पंत सोबत जसप्रीत बुमराह खेळत आहेत.
यापूर्वी ऋषभ पंतने दमदार अर्धशतक झळकावले. ऋषभ पंत याने केवळ ५८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने दुसर्या डावातील पहिल्या सत्रात लंच पर्यत ४ गडी गमावत १५१ धावा केल्या.
केपटाउन कसोटीतील तिसर्या दिवशी ( India vs S. Africa 3rd Test Day 3 ) भारताची सुरुवात खराब झाली होती. पहिल्या षटकाच्या दुसर्या चेंडूवर मार्को जेन्सन याने चेतश्वर पुजाराला बाद केले. कीगन पीटरसन याने पुजाराच अप्रतिम झेल पकडला. पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेला वेगवान गोलंदाज रबाडाने तंबूत धाडले. रहाणे याने अवघी एक धावाची भर घातली.
ऋषभ पंत आपला नैसर्गिक खेळ करत दक्षिण आफ्रिकेच्या गाेलंदाजाचा दबाव झुगारण्याचा प्रयत्न करत कर्णधार विराट कोहलीच्या साथीने भारताचा दुसरा डाव सावरला.
हेही वाचलं का?