India vs South Africa : राहणे-पुजाराच्या कसोटी करिअरचा THE END! | पुढारी

India vs South Africa : राहणे-पुजाराच्या कसोटी करिअरचा THE END!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना (India vs South Africa) केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याच्या इराद्याने दक्षिण आफ्रिकेत दाखल झालेल्या भारतीय संघाने सेंच्युरियनमध्ये विजयाने सुरुवात केली, मात्र जोहान्सबर्ग कसोटीत संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यजमान द. आफ्रिका संघाने संघर्षमय पुनरागमन करून मालिकेत १-१ अशी बरोबरीत साधण्यात यश मिळवले. त्यामुळे तिसरी कसोटी जिंकायचीच या इराद्याने दोन्ही संघ केपटाऊनच्या मैदानात उतरले. (India vs South Africa)

या कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कर्णधार विराट कोहली (७९) सोडता इतर कुठल्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा (४३) ने थोडाफार झुंजण्याचा प्रयत्न केला पण त्याला मोठा डाव खेळता आला नाही. पहिला डाव नाही निदान दुसऱ्या डावात तरी चांगली फलंदाजी करेल अशी अपेक्षा त्याच्याकडून होती पण ती सुद्धा फोल ठरली. अवघ्या ९ धावा करून तो तंबूत परतला. पुजारा सारखीच गत टीम इंडियाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याची. त्यानेही केपटाऊन कसोटीत सपशेल शरणागती पत्करली. पहिल्या डावात ९ आणि दुसऱ्या डावात १ धाव करून आपण आपल्या कसोटी करिअरचा जणू शेवट करून घेत आहोत असेच संकेत दिले. ( India vs South Africa )

केपटाऊन कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला आपल्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र दोन्ही डावात तसे होऊ शकले नाही. विशेषत: संघाचे दोन वरिष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी झाले.

ही मालिका सुरू होण्यापूर्वीच चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म सर्वाधिक चिंतेचा विषय होता. रहाणे आणि पुजारा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण नुकतीच प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेतलेल्या द्रविड गुरुजींनी पुजारा आणि राहणे या दोन्ही अनुभवी फलंदाजांवर भरोसा दाखवला. पुजारा-राहणे चांगलं प्रदर्शन करतील असंच त्यांना वाटलं. पण दोघांनी द्रविड गुरुजींच्या विश्वासावर पाणी पसरवलं.

दोन्ही फलंदाजांनी मालिकेतील तिन्ही सामने खेळले आणि एक-दोन डाव वगळता दोन्ही फलंदाजांना मोठा प्रभाव पाडता आला नाही. केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्या डावात आणि मालिकेतील शेवटच्या डावात पुजारा ९ आणि रहाणे अवघ्या १ धावा करून बाद झाले. अशा परिस्थितीत दोघांची या मालिकेतील आकडेवारी पाहणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांच्या कारकिर्दीच्या पुढील वाटचालीची दिशाच स्पष्ट करता येईल.

पुजाराचे अपयश

पुजारापासून सुरुवात करूया. संघाचा तिसरा क्रमांकाचा फलंदाज पुजाराची मालिकेत अत्यंत खराब सुरुवात झाली. तो सेंच्युरियन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. दुसऱ्या डावातही त्याला केवळ १६ धावा करता आल्या. त्यानंतर जोहान्सबर्गमध्ये पहिल्या डावात बराच वेळ क्रिझवर राहूनही केवळ ३ धावा करता आल्या. मात्र, दुस-या डावात त्याने कठीण परिस्थितीत संघाला सांभाळले आणि झुंज देत अर्धशतक झळकावले. त्याने ५३ धावांची खेळी साकारली. रहाणेसोबत शतकी भागीदारीही केली. त्यानंतर शेवटच्या कसोटीतही पुजाराने पहिल्या डावात चांगली सुरुवात केली, पण त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही आणि तो ४३ धावांवर बाद झाला, तर दुसऱ्या डावात केवळ ९ धावा केल्या. अशाप्रकारे पुजाराने ६ डावात केवळ २०.६ च्या सरासरीने १२४ धावा केल्या.

रहाणेही फेल..

पुजारापेक्षा जास्त वाद हा रहाणेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यावरून होता. रहाणेनेही मालिकेतील सर्व ६ डाव खेळले आणि त्याची आकडेवारी पुजारापेक्षा थोडी चांगली राहिली. रहाणेने सेंच्युरियनच्या पहिल्या डावात झटपट ४८ धावा केल्या, त्यामुळे चांगली धावसंख्या उभारण्यात मदत झाली. त्यानंतर दुसऱ्या डावात तो २० धावांवर बाद झाला. तर जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. तर दुसऱ्या डावात त्याने पुजाराच्या साथीने ५८ धावा केल्या. केपटाऊन कसोटीत तर त्याने निराशाच केली. कागिसो रबाडाच्या दोन उत्कृष्ट चेंडूंनी त्याचा बळी घेतला. रबाडाचे ‘त्या’ दोन भेदक चेंडूंमुळे रहाणेच्या करिअरचा शेवट होणार अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. रहानेला केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात ९ आणि दुसऱ्या डावात १ धाव काढता आली. म्हणजेच ६ डावात रहाणेने २२.६ च्या सरासरीने केवळ १३६ धावा केल्या.

टीम इंडियाकडे बदलाची संधी!

गेल्या जवळपास एक दशकापासून टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरची धुरा असलेल्या या दोन फलंदाजांची ही अवस्था या मालिकेतच नाही तर गेली दोन वर्षे सुरू आहे. या दरम्यान दोघांचीही सरासरी ३० च्या खाली राहिल्याने संघासह त्यांचेही करिअर अडचणीत आले आहे. या दोघांना दक्षिण आफ्रिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचा अनुभव. आता टीम इंडियाला पुढील वर्षभरात परदेशात फक्त ३ कसोटी खेळायच्या आहेत, ज्यात एक इंग्लंडमध्ये आणि दोन बांगलादेशमध्ये आहेत. त्याच्या आधी श्रीलंकेविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका आहे. अशा स्थितीत सध्याची कामगिरी पाहता दोघांनाही संघात स्थान मिळू शकते, पण प्लेइंग इलेव्हनचा रस्ता अवघड आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे आता बदल करण्याची एक चांगली संधी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Back to top button