

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अन्य आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. महाराष्ट्रातील राजकारणात होत असलेली सत्तापालट अनेकांसाठी धक्कादायक आहे. यातच आता राज्यातील मंत्रीमंडळदेखील बरखास्त झालं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. बहुमत सिद्ध करण्याच्या आदल्याच दिवशी संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त झाले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत जे काम केलं आहे, त्याचं कौतूक राज्यभरातून होत आहे. इतकचं नाही तर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी देखील उद्धव ठाकरे यांचे कौतुक केलं आहे.
प्रकाश राज यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहित यांचे कौतुक केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे-'तुम्ही खूप छान काम केलेत सर! @OfficeofUT … आणि मला खात्री आहे की, तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सांभाळले, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील..चाणक्य आज लाडू खात असतील..पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहील.. तुम्हाला आणखी बळ मिळो!'.
लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज हे चित्रपट इंडस्ट्रीसोबतचं आपल्या स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिध्द आहेत. ते या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत येत असतात. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी ठाकरे यांना टॅग करत हे ट्विट केले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी हे ट्विट केले आहे.