नाशिक : काझी गढीसाठी मनपाची ‘पीडब्ल्यूडी’कडे उडी | पुढारी

नाशिक : काझी गढीसाठी मनपाची ‘पीडब्ल्यूडी’कडे उडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दर पावसाळ्यात नाशिक शहरातील काझीच्या गढीचा विषय चर्चेला येतो. मात्र, त्याबाबत ठोस अशी कार्यवाही होत नसल्याने आजही या गढीवरील अनेक कुटुंबांचा जीव टांगणीला लागलेला आहे. गढीची जागा खासगी मालकीची असल्याने तिथे संरक्षक भिंत बांधणे महापालिकेला शक्य नसल्याने त्यासाठीचा प्रस्ताव मनपाने सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) सादर केला.

मनपा प्रशासनाने गेली कित्येक वर्षे संरक्षक भिंतीची मागणी करणारे रहिवासी आणि लोकप्रतिनिधींना आश्वासनांचा टिळाच लावला आहे. कारण इतक्या वर्षांनी मनपा प्रशासनाला जाग आली आणि खासगी जागा असल्याने त्या ठिकाणी बांधकाम करता येणार नसल्याचा साक्षात्कार मनपाला झाला. मध्यंतरी काही महिन्यांपूर्वी मनपाने काझीच्या गढीच्या संरक्षणाच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली.

या कामाची निविदा मनपातीलच एका लोकप्रतिनिधीला मिळणार म्हटल्यावर या भागातीलच एका पदाधिकार्‍याने विरोध दर्शविला. दोन लोकप्रतिनिधींमध्येच भांडण जुंपल्यावर महापालिकेने संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्तावच फाइलबंद केला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनचा रखडत पडलेला काझी गढीचा प्रश्न पुन्हा मागे पडलेला आहे. पावसाळ्यामध्ये काझीची गढी ढासळत असल्याने तेथील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले जाते. मात्र, परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर रहिवाशी पुन्हा गढीवर ठाण मांडून बसतात.

गोवा : मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची भेट

बांधकाम विभागाकडे लक्ष लागून
काझीची गढी ही जागा खासगी मालकीची असल्याने महापालिकेला त्या ठिकाणी काम करता येत नसल्याची भूमिका मनपा आयुक्त रमेश पवार यांनी घेतली. त्यांनी संरक्षक भिंतीच्या कामासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव सादर केला. यामुळे आता बांधकाम विभाग काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

Back to top button