कोल्हापूर : भाजपमुळे ताराराणी आघाडीला बळ | पुढारी

कोल्हापूर : भाजपमुळे ताराराणी आघाडीला बळ

कोल्हापूर; सतीश सरीकर : कोल्हापूर जिल्ह्यात ताराराणी आघाडी पक्षाने राजकीय वैभव अनुभवले. जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला होता. कालांतराने ताराराणी आघाडीला ओहोटी लागून फक्‍त नावापुरता पक्ष उरला; परंतु आता भाजपमुळे ताराराणी आघाडीला बळ मिळाले आहे. धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर निवड झाल्याने भाजपबरोबरच ताराराणी आघाडीचीही ताकद वाढण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरच्या राजकारणात काही वर्षांपूर्वीपर्यंत माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व होते. महापालिकेत त्यांची एकहाती सत्ता होती. ताराराणी आघाडीच्या नावाखाली अपक्षांची मोट बांधून महाडिकांनी महापालिकेवर अनेक वर्षे सत्ता गाजविली. राजकारणात महाडिक आणि ताराराणी आघाडी हे समीकरण बनले. गोकुळ, केडीसीसीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतही महाडिक ठरवतील तेच राजकारण होत होते. परंतु 2005 पासून महापालिकेत पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली आणि महाडिकांच्या सत्तेला सुरुंग लागला. महापालिकेपाठोपाठ महाडिकांच्या हातातून एकेक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या. महाडिक मूळचे काँग्रेसचे; परंतु सत्तेच्या सारीपाटात त्यांनी वेळोवेळी पक्ष बदलले. धनंजय महाडिक यांनी एकदा शिवसेनेतून लोकसभा लढविली. त्यानंतर राष्ट्रवादीतून रणांगणात उतरले. आता ते भाजपमध्ये आहेत. सद्यःस्थितीत त्यांचे चुलतभाऊ माजी आमदार अमल महाडिक व शौमिका महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबीय भाजपमध्ये सक्रिय आहेत. गेल्या काही वर्षांत महाडिक कुटुंबीयांना पराभवाची मालिका सहन करावी लागली; पण भाजपने साथ दिल्याने धनंजय महाडिक खासदार झाले आहेत.

महापालिका सभागृहाची मुदत नोव्हेंबर 2020 मध्ये संपली आहे. या कालावधीत महाडिकांकडे सत्तेचे एकही पद नसल्याने आणि काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सत्ता असल्याने अनेकांनी ताराराणी आघाडीला रामराम केला. यात महाडिकांच्या कट्टर समर्थकांचाही समावेश आहे. सध्या ते काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या छावणीत आहेत. सहा ते सात माजी नगरसेवक काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत; परंतु आता पुन्हा सत्तेचे फासे उलटले आहेत. महाडिक यांच्याकडे खासदारकी आली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ताराराणी आघाडीचे वजन वाढले आहे.

निवडणूक महापालिकेची आणि काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असले तरी खरी कुस्ती पालकमंत्री पाटील व खा. महाडिक यांच्यातच होणार आहे. पालकमंत्री पाटील यांना राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची साथ असेल, तर महाडिक यांच्याकडे भाजपची यंत्रणा असणार आहे. ताराराणी आघाडीही सोबतीला असेल. महापालिका निवडणुकीत जेथे भाजपचे कार्ड चालणार नाही, त्या भागात ताराराणी आघाडीचा उमेदवार असेल. अशाप्रकारे भाजप-ताराराणी आघाडीची रणनीती असणार आहे.

Back to top button