

आपल्या कामाने आणि भूमिकांनी मिस्टर परफेक्शनिस्टचे बिरुद दिमाखात मिरवणारा अभिनेता अमीर खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशा सगळ्या क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतर आमीर आता यूट्यूब क्षेत्रात उतरतो आहे. आमीर आता 'जनता का थिएटर' नावाचे यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे. या चॅनेलवर आमीर कोणतेही व्लॉग बनवणार नाही तर त्याच्या सिनेमाच्या थिएटर रिलीजनंतर यूट्यूबवर ते सिनेमे -ऑन-डिमांड प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिनेमे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील लोकांपर्यंत सहज आणि स्वस्त दरात पोहोचू शकेल. (Latest Entertainment News)
त्याच्या अलीकडे रिलीज झालेल्या सितारे जमीनबाबत त्याने हाच निर्णय घेतला आहे. सितारे जमीन पर’ ही फिल्म फक्त यूट्यूबवरच पाहायला मिळणार असून, कोणत्याही इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर ती रिलीज केली जाणार नाही.
हा सिनेमा 1 ऑगस्टपासून जगभरात यूट्यूबवर पाहता येणार आहे. या सिनेमात आमिर खान, जेनेलिया देशमुख यांच्यासोबत 10 बुद्धीमंद दिव्यांग कलाकारांचाही समावेश आहे.
अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि स्पेनसह 38 देशांमध्ये लोकल प्राईसिंगवर हा सिनेमा पाहता येईल. तर भारतात 100 रुपये शुल्क देऊन हा सिनेमा यूट्यूबवर पाहण्यासाठी उपलब्ध असेल. या सिनेमाने आतापर्यंत जगभरात ₹250 कोटींचा गल्ला जमवला आहे.
ज्यांना हा सिनेमा थिएटरवर पाहता येणे शक्य झाले नाही. त्या लोकांसाठी हा सिनेमा युट्यूबवर पाहणे सहजशक्य होणार आहे. विशेष म्हणजे पुढील काळात आमिर खान प्रॉडक्शन्सच्या इतर अनेक फिल्म्सही याच प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणार आहेत.
यावेळी बोलताना आमीर म्हणतो, “गेल्या 15 वर्षांपासून मी याचा विचार करत होतो की अशा लोकांपर्यंत कसा पोहोचता येईल जे थिएटरमध्ये जाऊ शकत नाहीत. आज अखेर तो क्षण आला आहे जेव्हा सर्व गोष्टी योग्य पद्धतीने एकत्र आल्या आहेत. सरकारने UPI सुरू केलं आणि भारत आता इलेक्ट्रॉनिक पेमेंट्समध्ये जगात क्रमांक 1 वर आहे. भारतातील इंटरनेटची पोहोचही झपाट्याने वाढली आहे. आणि यूट्यूब आता जवळजवळ प्रत्येक डिव्हाइसवर आहे. आता आपण भारतातील अनेक भागांपर्यंत आणि जगभरातील लोकांपर्यंत फिल्म पोहोचवू शकतो. माझं स्वप्न आहे की सिनेमा प्रत्येकापर्यंत पोहोचावा — योग्य दरात आणि सुलभ पद्धतीने. हा प्रयोग यशस्वी झाला, तर विविध प्रकारच्या कथा सांगणं क्रिएटिव्ह लोकांसाठी शक्य होईल. आणि हे नवोदित कलाकार व नव्या फिल्म मेकर्ससाठी एक मोठं व्यासपीठ असेल.”