Amir khan sitare zameen par Box office collection
आमीर खानच्या सितारे जमीन परने बॉक्स ऑफिसवर दमदार गल्ला जमवला आहे. आमीरच्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी हा सिनेमा नेट कलेक्शनच्या रेसमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा सहावा सिनेमा बनला आहे. या सिनेमाने आतापर्यंत सगळ्या भाषेतील एकत्रित मिळून 122.65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाच्या हिंदी भाषेतील सिनेमाचे योगदान 121.88 कोटी इतके आहे.
विशेष म्हणजे 2008ला रिलीज झालेला सिनेमा गजनीच्या कमाईलाही सितारे जमीन पर मागे टाकले आहे. गजनी सिनेमा भारतीय सिनेमाच्या यशाचा मानदंड मानला जातो. कारण कमाईच्याबाबत 100 कोटी क्लबची सुरुवात करणारा तो पहिला सिनेमा ठरला होता. 2022 मध्ये लाल सिंह चढ्ढाने बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ल्यानंतर हा सिनेमा जणू आमीरचा कमबॅक सिनेमा ठरला आहे म्हणल्यास चुकीचे होणार नाही. कारण लाल सिंह चढ्ढाने रिलीज झाल्यानंतर केवळ 61.12 कोटींची कमाई केली होती.
सामाजिक प्रश्नांना भावनिक पद्धतीने हाताळणारे सिनेमे ही आमीरची आधीपासूनची खासियत आहे. मग ते तारे जमीन पर असो किंवा पीके. सितारे जमीन परने पहिल्या शुक्रवारी 10.7 रुपयांची कमाई केली जी बऱ्यापैकी समाधानकारक होती. तर शनिवारी 20.2 कोटी आणि रविवारी 27.25 कोटींची कमाई केली होती. पण अपेक्षेप्रमाणे या सिनेमाने सोमवार, मंगळवार फारसा व्यवसाय केला नाही. पण वीकएंडला मात्र काही दिवसांची कमतरता भरून काढली. सिनेमाला प्रमोशनपेक्षा मौखिक प्रसिद्धीचा फायदा होतो आहे.
सितारे जमीन पर सहाव्या स्थानावर आहे. ठग्ज ऑफ हिंदुस्थानच्या कमाईशी तुलना करता हा सिनेमा अजून मागे आहे. पण सितारे.. ने गजनी (114 कोटी ), तलाश (93.61 कोटी) , तारे जमीन पर (62.95 कोटी), आणि लाल सिंह चढ्ढा ( 61.12) या सिनेमांना कमाईच्या बाबत मागे टाकले आहे.
हा सिनेमा आर. एस. प्रसन्ना यांच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. विशेष म्हणजे या सिनेमात आमीरच्या 90 वर्षांच्या आईने डेब्यू केला आहे. तर आमीरची बहीणही या सिनेमात दिसते आहे. जिनीलिया डिसूजा देशमुख, गोपी कृष्ण वर्मा, समवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी , आशिष पेंडसे हे या सिनेमाचा भाग आहेत. हा सिनेमा 20 जूनला रिलीज झाला होता.