

Piyush Mishra on Naseeruddin Shah CJP Protests : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनांना नसीरुद्दीन शाह यांनी पाठिंबा दिला होता. अलीकडेच, मुंबईत 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) द्वारे आयोजित आंदोलनात त्यांनी सहभागही घेतला होता, जिथे त्यांची भेट अभिजित दिपके यांच्याशी झाली. यावरून प्रसिद्ध अभिनेते-लेखक पीयूष मिश्रा यांनी नसीरुद्दीन शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनातील अनुपस्थितीबाबत विचारणा करत भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांनी सहवैमानिकाने केलेल्या हल्ल्यावेळी दाखवलेल्या धैर्याबाबत मौन बाळगल्याबद्दल त्यांच्यावर निशाणाही साधला आहे.
सोशल मीडियावर पीयूष मिश्रा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते नसीरुद्दीन शहा यांना काही थेट प्रश्न विचारताना दिसत आहेत. स्मित मच्छार प्रकरणावरील मौनाबाबत विचारून पीयूष मिश्रा म्हणाले, "हो, नसीर साहब, आदाब. मी पीयूष मिश्रा. तुमचा जुना ओळखीचा. तुम्ही अभिजित दिपके यांची भेट घेतली; ते खूप छान होते. सर, अलीकडेच एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या 'फ्लायदुबई'च्या १०७३ क्रमांकाच्या विमानात ही घटना घडली. तिथे भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांनी उल्लेखनीय कामगिरी केली; त्यांनी १८० लोकांचे प्राण वाचवले. कृपया त्याबद्दलही भाष्य करा. सर, त्यांचे अभिनंदन नक्की करा."
नुकताच 'लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी'मधील घटनेचा उल्लेख करत पीयूष मिश्रा म्हणतात की, "सर, कृपया लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीबाबतही काहीतरी संदेश द्या. तिथेही विद्यार्थी शिक्षण घेतात. तिथे एक धोकादायक घटना घडली होती. तुम्ही म्हणायचात ना की, 'मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि FTII मधून जेवढे शिकलो, तेवढेच या मुलांकडूनही शिकलो आहे'...? मग मला प्रश्न पडतो की, ही मुले नक्की कधी अभिनयाचे शिक्षक बनली? जर तुमची त्यांची भेट झाली, तर कृपया या विषयावर बोला, सर. तिथल्या मुलांप्रतीही तुमची सहानुभूती व्यक्त करा. आतापासून तुम्हाला नेहमीच प्रतिसाद मिळेल."
"सर, मी झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनासंदर्भातही आपली मदत मागितली होती. आपण एका पाकिस्तानी कवयित्रीची 'नझ्म' (कविता) पाठवलीत. मला माफ करा सर, पण तिथे 'नझ्म'ची गरज नव्हती; तिथे गरज होती ती पीठ, डाळ, 'लिट्टी' आणि गुळाची." असा टोलाही पीयूष मिश्रांनी लगावला आहे.
"जेव्हा जेव्हा आपण एखादे विधान कराल, तेव्हा तेव्हा पीयूष मिश्राकडून आपल्याला प्रतिसाद मिळेल. धन्यवाद." अशा शब्दांमध्ये पीयूष मिश्रा यांनी भविष्यातही नसीरुद्दीन शहा यांच्यावर निशाणा साधणार असल्याचे स्पष्ट केले आहे.