Sudhir Mishra Account Recovery: मुंबई पोलिसांकडून प्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांचे हॅक अकाउंट रिकव्हर

मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपास आणि ‘एक्स’च्या संबंधित यंत्रणेशी समन्वय साधत अकाउंट पुन्हा मिळवून दिले.
Sudhir Mishra
Sudhir MishraPudhari
Published on
Updated on

मुंबई: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांचे हॅक झालेले ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट ओशिवरा पोलिसांच्या सायबर पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे पुन्हा त्यांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे, अकाउंट रिकव्हर करण्यासाठी मिश्रा यांनी ‘एक्स’कडे केलेली विनंती कंपनीने नाकारली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपास आणि ‘एक्स’च्या संबंधित यंत्रणेशी समन्वय साधत अकाउंट पुन्हा मिळवून दिले.

मिश्रा यांच्या अकाउंटवर मध्यरात्री १२.५३ वाजता आयफोनच्या माध्यमातून अनधिकृत प्रवेश करण्यात आला होता. हॅकरने अकाउंटमध्ये 'सिक्युरिटी की' जोडण्याबरोबरच त्याला जोडलेला नोंदणीकृत ई-मेल पत्ताही बदलला. त्यामुळे मिश्रा यांचा अकाउंटवरील ताबा गेला.

अकाउंट हॅक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मिश्रा यांनी ते पुन्हा मिळविण्यासाठी ‘एक्स’च्या सपोर्ट टीमशी संपर्क साधला. मात्र, अकाउंटवरील त्यांचा मालकी हक्क पुरेशा प्रमाणात पडताळता येत नसल्याचे सांगत ‘एक्स’ने त्यांची रिकव्हरी विनंती नाकारली.

त्यानंतर मिश्रा यांनी ओशिवरा पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी अकाउंटचा तांत्रिक इतिहास, लॉगिनची माहिती आणि त्यात करण्यात आलेले बदल तपासले. मिश्रा यांचा अकाउंटवरील हक्क आणि ओळख निश्चित केल्यानंतर पोलिसांनी ‘एक्स’च्या संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला.

सोशल मीडिया अकाउंट हॅक करून ई-मेल, पासवर्ड आणि सुरक्षाविषयक माहिती बदलण्याचे प्रकार वाढत असताना, तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हॅक झालेले अकाउंट पुन्हा मिळवून देण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news